उदय सामंत यांनी माझ्याबद्दल सद्भावना व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे : आमदार भास्कर जाधव

आबलोली (संदेश कदम) : “नामदार उदय सामंत यांनी माझ्याबद्दल जी सद्भावना व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे; मात्र मी निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघांमध्ये पोलिसांच्या गाडीतून उदय सामंत यांनी पैसे आणले असे मी त्यांच्याबद्दल वक्तव्य केले नाही. मी नाव त्यांचे घेतले नाही. पोलिसांच्या गाडीतून माझ्या मतदारसंघांमध्ये पैसे वाटले गेले या मतावर मी आजही ठाम आहे; मात्र ते पैसे उदय सामंत यांनी वाटले असे मी कुठेही बोललो नाही, असे आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.
आमदार जाधव यांचे चिपळूण येथील नूतनीकरण केलेल्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. गेले दोन तीन दिवस आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. भास्कर जाधव राजकारणातून निवृत्त होणार, ते नाराज आहेत अशी चर्चा ऐकायला येत होती. त्यानंतर संपूर्ण राजकारण ढवळून निघाले होते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आमदार भास्कर जाधव यांना असा सल्ला दिला की आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ नये. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार उदयजी सामंत साहेब यांनी सुद्धा जाधव यांनी बाजूला होऊ नये अशी त्यांच्याबद्दल सद्भावना व्यक्त केली होती. त्याला आमदार जाधव यांनी उत्तर दिले आहे.



