मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

सावर्डे पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यामध्ये तिघेजण ताब्यात

१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चिपळूण : सावर्डे महावितरण सब स्टेशनजवळ सचिन वारे यांच्या वहाळ फाटा येथील मोकळ्या जागेत ठेवलेले ७४ लाख ८४ हजार ०९८ रुपये किंमतीचे ४५० लोखंडी इलेक्ट्रीक पोल चोरण्यात आले होते. या गुन्ह्याचा सावर्डे पोलिसांनी छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ कोटी ३४ लाख २४ हजार ५८९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सावर्डे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी फिर्यादी अखिलेष कुमार लालताप्रसाद प्रजापती (वय ४७, मूळ रा. विरार, पालघर; सध्या रा. भरणेनाका, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या संमतीशिवाय हे ४५० लोखंडी इलेक्ट्रीक पोल ट्रेलरमधून चोरून नेण्यात आले होते. फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.

तपासादरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेल्या तीन ट्रेलर्सचा शोध घेतला. त्यापैकी दोन ट्रेलर्स कोलाड (जि. रायगड) येथे, तर एक ट्रेलर कामथे येथे मिळून आला. या ट्रेलर्सवरील तीन चालकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये सुरेश नंदलाल खारोल (वय २४, रा. जोताया, जि. अजमेर, राजस्थान), पिंटु भना (वय २२, रा. कैसरपुरा, जि. अजमेर, राजस्थान) आणि पुखराज श्रीकिशन भील (वय २२, रा. सुरजपुरा, जि. अजमेर, राजस्थान) यांचा समावेश आहे.

या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेले ४५० लोखंडी इलेक्ट्रीक पोल आणि गुन्ह्यात वापरलेले तीनही ट्रेलर जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १,३४,२४,५८९ रु. इतकी आहे. अटक केलेल्या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १० जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी, चिपळूण उपविभाग राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक आबासो पाटील यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक गमरे, तसेच पोलिस हवालदार साळुंखे, कांबळे, कोळेकर, महिला पोलीस हवालदार कान्हेरे, पोलीस हवालदार कांबळे, पोलिस शिपाई भांगरे, जड्यार, महिला पोलिस कॉन्स्टेबल मुंढे, जाधव, पोलिस कॉन्स्टेबल चव्हाण आणि साठे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!