आरोग्यआर्टिकल

२९ सप्टेंबर २०२५ : जागतिक हृदय दिन

२९ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. हृदयरोग व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांविषयी जनजागृती करणे, त्यांचे प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे हे या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आज हृदयरोग हा जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण मानला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हृदयविकारांमुळे होतो.

२०२५ची थीम “Don’t Miss a Beat”

या वर्षीची थीम “Don’t Miss a Beat” म्हणजेच हृदयाचा “प्रत्येक ठोका जपा” असा स्पष्ट संदेश देते. हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. वेळेत तपासण्या करून घेणे, चेतावणी चिन्हे ओळखणे आणि त्वरित उपचार घेणे हे जीव वाचविण्यासाठी आवश्यक आहे. हृदयाच्या आजारांबाबत जागरूक राहणे म्हणजे आपल्या कुटुंबाचे व समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे होय.

भारतातील परिस्थिती : भारतामध्ये गेल्या काही दशकांत हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. जास्त तणाव, तेलकट व जंक फूडचा वाढता वापर, व्यायामाचा अभाव, धूम्रपान व मद्यसेवन ही प्रमुख कारणे ठरत आहेत.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपाय : 

1) हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीत लहान-मोठे बदल आवश्यक आहेत.

2) आहारामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, डाळी, सुकामेवा यांचा समावेश करावा.

3) तेलकट व तळलेले पदार्थ, जास्त मीठ व साखर टाळावी.

4) दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम, चालणे, योग किंवा सायक्लिंग करावे.

5) तणाव टाळण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि छंद जोपासावेत.

6) धूम्रपान व मद्यसेवन पूर्णपणे बंद करावे.

7) योग्य वजन व पुरेशी झोप हृदयासाठी आवश्यक आहे.

8) दरवर्षी रक्तदाब, साखर व कोलेस्टेरॉल तपासणी करून घ्यावी.

रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने या दिवसानिमित्त विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात नियमित मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी करून औषधो पचार, समुपदेशन, आरोग्य सल्ला दिला जात आहे. तसेच सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये STEMI हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमअंतर्गत जिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे स्तरावर शासनातर्फे ईसीजी मशीन चे वाटप करण्यात आलेले आहे.

हा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये हब व स्पोक (“Hub and Spoke”) model नुसार राबविला जातो. ह्यामध्ये वरील नमूद सर्व आरोग्य संस्था या स्पोक (spoke) म्हणून काम करतात व त्या आरोग्य संस्थांच्या जवळ असलेले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल(multi speciality hospitals) हे हब ( hub )म्हणून काम करतात. जेव्हा स्पोक ( spoke) येथे एखादा myocardial infarction (हृदय विकार) च्या रुग्णाचे निदान झाल्यावर तो रुग्ण त्वरित हब (Hub) येथे संदर्भित करण्यात येतो, जेणेकरून रुग्णावर वेळेत योग्य उपचार होऊन त्याचे प्राण वाचण्यास मदत होते. याचा आजवर खूप रुग्णांना फायदा झाला आहे. तसेच तातडीच्या प्रसंगी वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी व्यक्तीचा जीव वाचावा यासाठी आरोग्य विभागामार्फत प्रत्येक गावागावात, शाळा-महाविद्यालय, अनेक संस्थेत सीपीआर कसा द्यावा याबाबत प्रशिक्षित व्यक्तीकडून प्रशिक्षण दिलेले आहे.

तसेच सध्या “स्वस्थ नारी, सशक्त परिवार महिमेत सर्व महिलांची रक्तदाब, शुगर इतर तपासण्या केल्या जात आहेत. तसेच नेहमीच इतर शिबिरांमार्फत फ्री हृदय तपासणी शिबिरे, व्याख्याने,आयोजित केले जातात. तसेच माहितीपत्रके,सामाजिक माध्यमे याद्वारे नेहमी आरोग्यविषयक उपक्रम/ कार्यक्रम आयोजित केले जातात. “प्रत्येक ठोका महत्त्वाचा आहे” हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वॉकाथॉन, सायक्लोथॉन तसेच सोशल मीडियाद्वारे मोहिमा राबविणे आवश्यक आहे.

हृदय हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव असून त्याचे आरोग्य सांभाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. २०२५ च्या जागतिक हृदय दिनाची थीम “Don’t Miss a Beat” आपल्याला सांगते की आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, नियमित व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली व वेळेवर आरोग्य तपासणी केल्यास हृदय निरोगी राहते.

“निरोगी हृदय – निरोगी जीवन” हा संदेश आत्मसात करून समाजातील प्रत्येक नागरिकाने हृदयविकारांविरुद्ध एकत्रितपणे लढा देणे गरजेचे आहे.

– डॉ. अनिरुद्ध आठल्ये 

जिल्हा आरोग्य अधिकारी,

जिल्हा परिषद रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!