सुनीता साळवी यांचा अपघातात मृत्यू

रत्नागिरी : शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसरात रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास झालेल्या एका अपघातात ५८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुनीता राजेश साळवी (रा. हिंदू कॉलनी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता साळवी या काल (१८ जानेवारी) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून कामानिमित्त लाला कॉम्प्लेक्स परिसरातून जात होत्या. कॉम्प्लेक्सजवळील स्पीड ब्रेकरजवळ त्या आल्या असताना, मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेमुळे सुनीता साळवी खाली पडल्या आणि तेच अज्ञात वाहन त्यांच्या अंगावरून गेले.
या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुनीता साळवी यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या नातेवाईकांनी आणि हितचिंतकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी पथकासह घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने फरार वाहन चालकाचा शोध घेत आहेत.



