
चिपळूण : लोटे- परशुराम येथील गोशाळेच्या विविध मागण्यांसाठी हभप भगवान कोकरे महाराजांनी सलग तिसऱ्या दिवशी बेमुदत उपोषण सुरू ठेवले आहे. या उपोषणाला पहिल्या टप्प्यात यश आले असून, शासनाने गो- परिपोषण योजनेअंतर्गत गोशाळेच्या बँक खात्यावर ३३ लाख ४८ हजार रुपये जमा केले आहेत; मात्र गोशाळेचे अनुदान, व्यावसायिक दराने वीजपुरवठा आणि जमिनीच्या मागण्यांवर तोडगा निघालेला नाही. या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार न घेण्याचा पवित्रा कोकरे महाराजांनी घेतला आहे.
लोटे- परशुराम येथे गेल्या काही वर्षांपासून कोकरे गोशाळा चालवत आहेत. गोशाळेत ११०० हून अधिक गाई-वासरांची देखभाल केली जाते; मात्र गोशाळेच्या प्रश्नांसाठी कोकरे यांना संघर्ष करावा लागत आहे. विविध मागण्यांसाठी गेल्या दोन वर्षात चारवेळा उपोषण केले. १७ मार्चपासून ते पाचव्यांदा उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला पहिल्या टप्प्यात यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी गोशाळेच्या चाऱ्याची दखल घेऊन गो परिपोषण योजनेअंतर्गत ३३ लाख ४८ हजार रुपये गोशाळेच्या बँकखात्यात जमा केले आहेत, अशी माहिती कोकरे यांनी पत्रकारांना दिली. या कामी मत्स्य बंदर मंत्री नितेश राणे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार नीलेश राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शासनाने गाईंच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवला असला तरी अजून काही प्रश्न प्रलंबित आहेत. गोशाळेचे मंजूर २५ लाखांचे अनुदान तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देण्याची शिफारस केली असतानाही ते अद्याप अदा झालेले नाही. ते अदा व्हावे. गोशाळेला व्यावसायिक दराने वीजपुरवठा होत असल्याने सुमारे साडेपाच लाख रुपये बिल थकीत राहिले आहे, ते बिल शासनाने माफ करावे. शेतीप्रमाणे वीजबिलाची आकारणी व्हावी यासाठी महावितरणकडे पाठपुरावा केला जात आहे; मात्र, अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याची भावना कोकरे यांनी या वेळी व्यक्त केली. प्रलंबित प्रश्नांसाठी आपले उपोषण सुरूच राहणार आहे. सध्या प्रतिगोवंश 50 रुपयाचे अनुदान जमा झाले आहे. यामुळे गायींच्या चाऱ्यांसाठी ही मोलाची मदत झाली आहे.



