रत्नागिरी शहरात सीएनजीचा तुटवडा; वाहनचालक त्रस्त

रत्नागिरी : शहरात शिमगोत्सवापासूनच सीएनजीचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. आता तर गेल्या ४ ते ५ दिवसांपासून अधिकच तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालक तसेच रिक्षाचालक ही हैराण झाले आहेत. ऐन शिमगोत्सवातच तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षा चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

चाकरमानी परतीला लागलेले असताना त्यांना सीएनजीच्या रांगेमध्ये तासन्तास उभे राहावे लागत आहे. रत्नागिरी शहरामध्ये सीएनजीचे एकूण तीन पंप असून देखील रिक्षा चालकांना तसेच इतर वाहनांना देखील सीएनजीचा पुरवठा होत नसल्याने चालक हैराण झाले आहे. जे तीन पंप आहेत त्यातील एकाच पंपावरती सीएनजी कमी दाबाने मिळत आहे. बाकी दोन पंप काही वेळेसाठी चालू असतात. या पंपांमध्ये पुरेसा साठा नसल्याने रिक्षाचालक हे तीन-चार तास रांगेमध्ये उभे राहून सीएनजी मिळण्याची वाट पाहत आहेत. हे असेच सुरू राहिले तर रिक्षाचालक मालक मोठे आंदोलन करण्याच्या विचारात असून, जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून रत्नागिरीत शहरात होणारा सीएनजी तुटवडा योग्य प्रमाणात करण्याची मागणी केली जात आहे.



