अ. के. देसाई हायस्कूलमध्ये जागतिक वन दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : सामाजिक वनीकरण रत्नागिरीच्या वतीने मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलमध्ये २१ मार्च हा जागतिक वन दिन उत्साह साजरा करण्यात आला. यानिमित्त रांगोळी, कविता लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलने अनेक यशस्वीपणे उपक्रम राबविले आहेत.

प्रारंभी मुख्याध्यापिका श्रीमती प्रज्ञा दळी यांच्या हस्ते विभागीय वन अधिकारी रणजीत गायकवाड, सहाय्यक वनरक्षक श्रीमती अं. दी. तरडे, वनक्षेत्रफळ श्रीमती स्नेहल अडसूळ, वनपालश्री निलेश कुंभार, वनपाल उदय भागवत, श्री. साबणे, प्रा. प्रशांत सुर्वे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी जागतिक वन दिनाचे औचित्य साधून झाडाला पाणी घालून विविध कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मुख्याध्यापिका श्रीमती दळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सर्वांनी किमान एक तरी झाड लावावे, त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन केले.

विभागीय वन अधिकारी श्री. गायकवाड यांनी २१ मार्च जागतिक वन दिनाचे महत्त्व सांगितले. निसर्गशक्तीचा विकास करा. आपले आयुष्य सुखी व समृद्ध करण्याची ताकद निसर्गामध्ये आहे. आपण निसर्ग केवळ पाठ्यपुस्तकात न अभ्यासता निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्याचे जवळून निरीक्षण केले पाहिजे. अनंत काळापासून निसर्गच आपले पालन पोषण करत आहे. त्याच्याप्रती आपल्या मनात कायम प्रेम असायला हवे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच जागतिक वन दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. गायकवाड आणि मुख्याध्यापिका श्रीमती दळी यांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. ही भित्तीपत्रके बीएडच्या छात्रअध्यापकांनी केली होती. औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग यावर भाष्य करणाऱ्या या भित्तीपत्रकात औषधी वनस्पतींचे नमुने सुद्धा लावण्यात आले होते. यावेळी रांगोळी प्रदर्शन व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याची पाहणी सामाजिक वनीकरणाच्या मान्यवरांनी केली.

बीएडच्या छात्रअध्यापक व विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर आधारित सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. त्याचे परीक्षण कलाशिक्षक जयसिंग लोहार व प्रा. पंकज सुर्वे यांनी केले. यामध्ये प्रथम क्रमांक रेणुका राठोड, द्वितीय क्रमांक पूनम जाधव व सायली सुर्वे, तृतीय क्रमांक रियाज मुजावर यांनी पटकावला. कविता लेखनासाठी निसर्ग हा विषय देण्यात आला होता. यात दामिनी राजेश लोहार, तन्वी परशुराम ताम्हणकर, वरूण योगेश साळवी यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले. या कवितांचे परीक्षण सायली जोशी यांनी केले होते. शिवाय त्यांनी एक उत्तम स्वरचित कविता कवितेचे वाचन केले.

रांगोळी व कविता लेखन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रशालेतील मुलींनी निसर्गावर आधारित गाण्यावर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या नृत्यात आस्मा साखरकर, पौर्णिमा सनगरे, रोजीया शेख, गंगा देवांगण, जीविका घडशी, अंकिता पवार या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. तर “वसुंधरा” या संतोष गार्डी लिखित व दिग्दर्शित नाटिकेने कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढवली. यामध्ये अलिशा जाधव, सानिका वाडेकर, व्यास गावंड, दुर्वेश सागवेकर या माजी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भूमिका केल्या. त्याचबरोबर रिया खेत्री, चांदबी शेख, आरोही शिंदे, भावेश खरात, महेक मुल्ला, पूर्वा कांबळे, मैथिली कांबळे, लावण्या साळुंखे यांनी उत्तम भूमिका करत वसुंधरा नाटीकेचा विषय प्रेक्षकांच्या मनावर बिंबवला.
विभागीय अधिकारी रणजीत गायकवाड यांनी नाटिकेचे कौतुक केले. जागतिक वन दिनानिमित्त आयोजित सर्वच कार्यक्रम उत्कृष्ट होते. सर्व कार्यक्रम पर्यावरणाचे, निसर्गाचे, झाडांचे महत्त्व उठावदारपणे सांगणारे होते. नृत्य व नाट्यकृतीतून दाखवलेल्या घटना प्रत्येकाच्या मनावर कोरल्या गेल्या, अशी मते मान्यवरांनी मांडली. कार्यक्रमात सहभागी सर्व कलाकारांचा सन्मान सामाजिक वनीकरण विभागाने प्रमाणपत्र देऊन केला.
या कार्यक्रमात जयसिंग लोहार यांनी निसर्गावर उत्तम गीत सादर केले आणि मान्यवरांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, व सूत्रसंचालन प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक संतोष गार्डी यांनी केले.


