मुख्य बातमी

परमपूज्य गुरुमाऊलींच्या सान्निध्यात महासत्संग सोहळ्याचे आयोजन

रत्नागिरीत विश्वशांती हेतू सामूहिक श्री स्वामी चरित्र सारामृत पठण व श्रीचक्रराज श्रीयंत्र पूजन

रत्नागिरी : परशुरामाच्या पावन भूमीत, कोट्यवधी सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या पवित्र उपस्थितीत महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४ वाजता, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथील नवीन ट्रक वाहनतळावर हा भव्य सोहळा होणार आहे. या दिव्य सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विश्वशांतीसाठी सामूहिक श्री स्वामी चरित्र सारामृत पठण व श्रीचक्रराज श्रीयंत्र पूजन, जे सकल सेवेकरी परिवाराच्या वतीने साजरे होणार आहे.

भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणासाठी घेतलेल्या अवतारांमध्ये भगवान श्री दत्तात्रेय हा विशेष मानला जातो. इ.स. ११४९ मध्ये पंजाबमधील छेली खेडे येथे भगवान दत्तात्रेयांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अगम्य व अद्वितीय अवतार धारण केला. त्यांनी संपूर्ण विश्वात भ्रमण करत चीन, मलाया, सिंगापूर तसेच भारतात भक्तिमार्ग व आध्यात्मिक जागृती केली. त्यानंतर इ.स. १३७८ मध्ये आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात १५० वर्षे मानवकल्याणासाठी कार्य केले. पुढे, इ.स. १५२८ मध्ये महाराष्ट्रातील कारंजा येथे त्यांनी श्री नृसिंहसरस्वती म्हणून प्रकट होऊन औदुंबर, वाडी, गाणगापूर यांसारखी तीर्थस्थळे साकारली. त्यांच्या कार्याने अंधश्रद्धा दूर होऊन भक्तांना खऱ्या भक्तीचा मार्ग सापडला. शेवटी, इ.स. १६७८ मध्ये अक्कलकोट येथे त्यांनी २२ वर्षे भक्तांना मार्गदर्शन करत स्वामी समर्थ संप्रदायाचा पाया घातला. स्वामी समर्थांच्या या महान कार्याची अखंड गाथा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात संकलित करण्यात आली आहे, जो आजही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे.

श्री स्वामी समर्थ सेवामार्गाची प्रेरणादायी यात्रा

सद्गुरु परमपूज्य मोरेदादा यांनी नाशिकमध्ये श्री स्वामी समर्थ सेवामार्गाची स्थापना केली. त्यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून, समाजातील अंधश्रद्धा व अज्ञान दूर करण्याचे कार्य केले. त्यांचे प्रेरणास्थान घेऊन परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी महाराष्ट्रभर हजारो सेवा केंद्रे स्थापन केली आणि लाखो भक्तांना व्यसनमुक्ती व मानसिक शांती प्रदान केली. प्रश्नोत्तर सेवा, आध्यात्मिक ग्रंथसंपदा आणि समाजजागृतीच्या माध्यमातून त्यांनी स्वामी समर्थ संप्रदायाला नवचैतन्य दिले.

परमपूज्य गुरुमाऊलींचे कोकण भूमीत आगमन : भक्तांसाठी सुवर्णसंधी

श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः कोकणात येऊन धर्मजागृती केली होती. त्यांनी त्यांचे पट्टशिष्य आनंदनाथ महाराजांना वेंगुर्ल्यात, तर केळकरबुवांना चिपळूण येथे पाठवून सेवा कार्य केले. कोकणातच स्वामीसुत, सद्गुरु पिठले महाराज आणि “श्री स्वामी चरित्र सारामृत” लिहिणारे विष्णू बळवंत थोरात यांसारखी संत मंडळी जन्माला आली. यामुळे कोकण भूमीला धार्मिक, आध्यात्मिक व संत परंपरेचा वारसा लाभला आहे.

महासत्संग सोहळ्याचे वैशिष्ट्ये

१ एप्रिल २०२५ रोजी परमपूज्य गुरुमाऊलींच्या सान्निध्यात होणाऱ्या या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे सामूहिक श्री स्वामी चरित्र सारामृत पठण – हजारो भक्त एकत्र येऊन श्री स्वामी चरित्राचे सामूहिक पठण करतील, जे विश्वशांती व आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचे आहे.

श्रीचक्रराज श्रीयंत्र पूजन – भगवान दत्तात्रेयांनी मानव कल्याणासाठी दिलेले हे पूजन केल्याने मानसिक स्थैर्य, सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीचा लाभ होतो.

परमपूज्य गुरुमाऊलींचे अमृततुल्य हितगुज – गुरुमाऊलींच्या प्रवचनातून भक्तांना जीवनाचे योग्य मार्गदर्शन मिळेल.

सकल सेवेकरी परिवाराने या महासत्संग सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या जीवनाला दिशा द्या आणि भक्तिमार्गाने प्रगती साधा, असे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!