नाटे बाजारपेठेत आगीचा तांडव; सात दुकाने जळून राख

राजापूर : तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील व्यापारी संकुलाला शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीच्या तांडवात सात दुकाने अवघ्या काही तासांत राख झाली आहेत. ही इमारत राजेश दत्ताराम पावसकर (धाऊलवल्ली) यांची मालकीची असून, यामध्ये रहिवासी नसल्याने जीवितहानी टळली; मात्र व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या आगीत दिगंबर गिजम यांचे उपहारगृह, भीम खंडी चायनीज फास्ट फूड सेंटर, प्रदीप मयेकर यांचे टेलरिंग शॉप, केदार ठाकूर यांचे कापड व प्लास्टिक वस्तू विक्री, प्रसाद पाखरे यांचे फोटो स्टुडिओ (कॅमेरे, प्रिंटिंग उपकरणे, संगणक), निकिता गोसावी यांचे ब्युटी पार्लर आणि नारायण गोसावी यांचे कटलरी साहित्यांचे गोडाऊन जाळून खाक झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच नाटे सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर, नाईट चेकिंग अमलदार आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. ग्रामस्थांनीही वेळेचा विचार न करता स्वतःच्या वाहनांतून पाण्याची व्यवस्था केली. प्रत्येकजण जमेल त्याप्रमाणे आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.
राजापूर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी रात्री अडीचच्या सुमारास पोहोचताच आग आटोक्यात आणण्यात आली; मात्र तोवर सर्व गाळे जळून भस्मसात झाले होते. नाटे येथील अनेक युवकांबरोबरच साखरी नाटे येथील युवकांनीही याकामी शर्थीचे प्रयत्न केले. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले; पण जळून खाक झालेल्या गाळ्यांच्या मालकांच्या जीवनात मात्र गडद अंधार पसरला. “हे फक्त दुकान नव्हते, आमचं जग होतं,” असं भावूक उद्गार एका व्यापाऱ्याने डोळे पुसताना काढले.
दरम्यान, या आगीची माहिती मिळताच नाटे गावातील अनेक युवक तात्काळ घटनास्थळी धावले. विशेष म्हणजे साखरी-नाटे येथील मुस्लिम युवकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. मजीद गोवळकर यांनी “ही केवळ आग नव्हती, ती संधी होती एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची. आम्ही कोणाचे दुकान, कोणाचा धर्म न पाहता फक्त माणूस म्हणून रात्रभर पाणी आणत राहिलो,” असे सांगितले.
दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार या आगीत लाखो रुपयांचे नुकसान निश्चित असून, स्थानिक प्रशासन, पोलिस आणि नगरपालिकेच्या समन्वयाने पुढील चौकशी सुरू आहे.



