
रत्नागिरी : अपहरण करून खंडणी मागितल्याचा प्रकार १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा ते पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास साखरपा ते देवरुख रस्त्यावरील वांझोळे गावी रोडवर घडला होता. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात रत्नागिरी पोलिसांनी दोघांना बदलापूर येथून, तर दोघांना संगमेश्वर येथून ताब्यात घेतले आहे. या चौघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत सविस्तर माहिती देताना ते म्हणाले, ” सोने व्यवसायिक धनंजय गोपाळ केतकर (वय ६३, रा. मार्लेश्वर फाटा, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हे १७ सप्टेंबर रोजी त्यांची मर्सिडिज (क्र. एमएच-०१-ई-८०१२) मधून त्यांच्या घरी जात असताना साखरपा ते देवरुख मार्गावरील वांझोळे गावी रोडवर रात्री १०.३० ते १०.४५ च्या दरम्याने एका पांढऱ्या रंगाच्या गाडीने त्यांच्या गाडीला घासून पुढे उभी केली. श्री. केतकर यांनी गाडी थांबवून याचा जाब विचारला असता त्यांना पांढऱ्या गाडीत जबरदस्तीने बसवून त्यांच्या गळ्यात असणाऱ्या ३ सोन्याच्या १६,००,००० किंमतीच्या चैन व खिशामधील रोख रक्कम २० हजार जबरदस्तीने काढून घेतल्या. एका ठिकाणी आणून अन्य दुसऱ्या गाडीमध्ये बसवून, गाडीतील अनोळखी ५ इसमांनी “तुला सोडायचे किती पैसे देणार व कुठे देणार” असे विचारून पाच लाखांची खंडणी मागितली. तसेच श्री. केतकर यांच्या डोक्यात कठीण वस्तू मारून, दरीत टाकून देऊ अशी धमकी दिली. १८ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वाजवायच्या सुमारास वाटुळ गावी रोडवर सोडून दिले. म्हणून श्री. केतकर यांनी देवरुख पोलीस ठाण्यात १० अनोळखी इसमांविरुध्द दिलेल्या तक्रारीवरून बीएनएस २०२३ चे कलम 309(4), 310(1), 311, 142(2), 127(2), 115(2), 351 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास देवरूख पोलीस ठाणे येथून सुरू असताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी लागलीच गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगवेगळी तपास पथके रवाना करण्याबाबत सूचना दिल्या व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन, तपासाबाबत मार्गदर्शन केले व आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना केली.
या गुन्ह्याचा समांतर तपास रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून चालू असताना पोलीस हवालदार विजय आंबेकर यांच्या तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी हे बदलापूर (जि. ठाणे) या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. तपास पथकांनी गुन्ह्यातील दोन आरोपींना बदलापूर येथून ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडे अधिक तपास केला असता या गुन्ह्यातील सहभागी दोन आरोपींना पनवेल (नवी मुंबई) येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे असलेली एक स्कॉर्पिओ वाहन, ५ मोबाइल हँडसेट व १ लाख २० हजार रोख रक्कम असे मिळून एकूण २६ लाख ७५ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास देवरुख पोलीस करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे आणि तपास पथकातील श्रे.पो.उनि. संदीप ओगले, सपोफौ पांडुरंग गोरे, पोहवा नितीन डोमणे, पोहवा विनायक राजवैद्य, पोहवा विक्रम पाटील, पोहवा गणेश सावंत, पोहवा योगेश नार्वेकर, पोहवा प्रवीण खांबे, पोहवा विवेक रसाळ, पोहवा योगेश शेट्ये, चा. पोशि अतुल कांबळे, पोहवा रमिज शेख, मपोकों शितल पिंजरे, श्रे.पो.उनि. प्रशांत बोरकर, सपोफौ सुभाष भागणे, पोहवा शांताराम झोटे, पोहवा बाळू पालकर, पोहवा विजय आंबेकर, पोहवा सत्यजित दरेकर, पोहवा दीपराज पाटील, पोहवा अमित कदम, पोहवा भैरवनाथ सवाईराम, पोहवा विनोद कदम, चा.पो.ना दत्ता कांबळे व पोकों निलेश शेलार यांनी पार पाडली.



