राज्यावर आजही वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचं संकट
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारपिटीची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. हा अवकाळी पाऊस ४ एप्रिलपर्यंत राहणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता असून, या भागात काही ठिकाणी ‘गारपीट’ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, कोकण परिसरात देखील अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बरसण्याची शक्यता आहे. राज्यात काही भागांत ‘यलो तसेच ऑरेंज’ अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन भागात हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे, तर पश्चिम बंगालपासून मध्य प्रदेशपर्यंत द्रोणीय स्थिती तयार झालेली आहे. दक्षिण-पूर्व मध्य प्रदेशाच्या काही भागांत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. याबरोबरच लक्षद्वीप ते कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या सर्व स्थितीमुळे कोकणासह राज्याच्या सर्वच भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट यासह काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हा पाऊस ४ एप्रिलपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, राज्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा केळी, द्राक्ष, कांदा पपई, गहू, मका, आदी पिकांना फटका बसला. राज्यात दोन दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत असला तरी कमाल तापमानाचा कहर कायम आहे. बुधवारी अहिल्यानगर ३७, बीड ३९.८, मालेगाव ३८.४, मुंबई ३६.९, नाशिक ३७.३, सोलापूर येथे ३८ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज, गुरुवारी आकाश ढगाळ राहील. तसेच हलका पाऊस होईल, असा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात पिकांचे नुकसान झाले आहे.


