कारवांचीवाडी अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील एसटी बस आणि कार अपघातप्रकरणी कारचालकावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमन दीपक अगरवाल (३३, रा. ठाणे, मुंबई) असे कारचालकाचे नाव आहे.
हा अपघात गुरुवारी सकाळी झाला असून, यामध्ये एकाचा मृत्यू, तर तिघे जखमी झाले आहेत. या अपघातात विकास कोंडिबा नवसरे (३३, मूळ रा. सातारा, सध्या रा. मुंबई) याचा मृत्यू झाला, तसेच किशोर प्रकाश तांदळे (३५, रा. चिपळूण), सागर दीपक भादवे (३७, रा. चेंबूर, ठाणे), रविकुमार नगारम (४४, रा. ठाणे, मुंबई) हे तिघे जखमी झाले.
नमन अगरवाल हे गुरुवारी सकाळी कारने रत्नागिरीकडे येत असताना कारवांचीवाडी येथे त्यांनी एसटी बसला धडक दिली. या अपघातात विकास नवसरे यांचा मृत्यू झाला, तसेच अन्य तिघे जखमी झाले. याप्रकरणी विकास नवसरे यांच्या मृत्यूस आणि तिघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याने कारचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.



