मुंबईसह कोकणात आज उष्णतेचा “यलो अलर्ट”
नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रात सध्या पश्चिमेपासून उत्तरेपर्यंत उष्ण वारे वाहताना दिसत आहेत. राज्याला अथांग सागरी किनारा लाभलेला असतानाही या सागरी क्षेत्रालासुद्धा ही उष्णता थोपवून धरता आलेली नाही. परिणामी दिवसागणिक राज्यात उकाडा आणखी वाढतच चालला आहे. पुढील २४ तासांसाठी राज्यातील मुंबई आणि कोकण पट्ट्याला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
कोकणात एकिकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा असतानाच दुसरीकडे मात्र येथील पहाट धुक्याच्या चादरीने होताना दिसत आहे. त्यामुळे पहाटेची वेळ वगळता संपूर्ण दिवसांची होरपळच कोकणवासियांच्या वाट्याला येताना दिसत आहे. सोमवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गांवर धुक्याची चादर पाहायला मिळाली. सकाळी ८ वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना काही प्रमाणात कसरत करावी लागली. दिवसा कडक उन आणि रात्री काही प्रमाणात थंडी असे सध्या तळकोकणात वातावरण पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात होळीआधीच दुसरी उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ज्यानुसार मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्याचा पारा ३८ अंशांवर राहील, असा इशारा जारी करण्यात आला आहे. तर, मुरबाडचे तापमान ४२.३ अंशांवर असेल. राज्यातील ५ जिल्ह्यांना उष्णतेचा “येलो अलर्ट” देण्यात आला असून, यामध्ये मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील तापमानात वाढ नागरिकांपुढे अडचणी निर्माण करताना दिसेल हेच स्पष्ट होत आहे.



