काँग्रेसकडून रत्नागिरी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर
रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्षपदी सोनललक्ष्मी घाग, तर दक्षिणची धुरा जमीर खलिफेंकडे

रत्नागिरी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त अध्यक्षांची यादी २० मे रोजी जाहीर केली आहे. ‘संघटन सृजन अभियाना’चा एक भाग म्हणून करण्यात आलेल्या या संघटनात्मक जिल्ह्यांच्या पुनर्रचनेला आणि नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीला काँग्रेस अध्यक्षांनी तात्काळ प्रभावाने मंजुरी दिली आहे.
या नव्या बदलानुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी पूर्वी प्रमाणेच दोन स्वतंत्र नियुक्त्या करण्यात आल्या असून, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्षपदी सोनललक्ष्मी वीरधवल घाग यांची, तर रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी जमीर खलिफे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोनललक्ष्मी घाग यांनी आजवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची आणि स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला मिळवून दिलेल्या यशाची पोचपावती म्हणून पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर सलग दुसऱ्यांदा या पदाची जबाबदारी विश्वासाने सोपवली आहे. या नियुक्त्या करण्यापूर्वी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नेमलेल्या निरीक्षकांनी प्रत्येक जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेतला. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि अन्य घटकांशी चर्चा करून आपले सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर केले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर निरीक्षकांसोबत आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतरच या अंतिम नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
सोनललक्ष्मी घाग आणि जमीर खलिफे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पक्षाने युवा नेतृत्वाकडे नव्याने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.


