मुख्य बातमी

गोवंश सदृश्य प्राण्याचे मांस सापडल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

मारुती मंदिर परिसरातील घटना

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमनच्या खोलीत गोवंश सदृश्य प्राण्याचे मांस सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वॉचमन रणजीत दमाई, त्याची पत्नी आरती रणजीत दमाई आणि नासिर मुल्ला या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, वॉचमन दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

काल (३ जून) संध्याकाळी मारुती मंदिर नजीकच्या एकता मार्ग येथे गोवंश सदृश्य प्राण्याचा पाय टाकलेला आढळून आल्याने सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. माहिती मिळताच पोलिसही तात्काळ दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका दुचाकीवरून तिघेजण येऊन त्यापैकी एक जण हातात पिशवी घेऊन निघून गेल्याचे दिसून आले. या व्यक्तीचा शोध घेतला असता तो नजीकच्या यशोदा अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या खोलीची झडती घेतली असता, पोलिसांना गोवंश सदृश्य प्राण्याचे मांसाचे अवशेष सापडले. पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून मांस जप्त केले आणि वॉचमनच्या पत्नीला तात्काळ ताब्यात घेतले.

यानंतर पोलिसांनी वॉचमन आणि दुचाकीवरील इतर दोघांचा कसून तपास सुरू केला. मंगळवारी रात्री उशिरा वॉचमनसह आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकरणामुळे रत्नागिरीतील सकल हिंदू समाज आक्रमक झाला असून, तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईंणकर, पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

गोरक्षक सुशील कदम यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत वॉचमनच्या घरात सापडलेले मांस गोमांस असल्याची खात्री पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करून सविस्तर पंचनामा करून ते जप्त केल्याचा उल्लेख आहे. या घटनेत केवळ वॉचमन आणि त्याची पत्नी नसून, गोमातेची हत्या करणारे आणि गोमांस पुरवठा करणारे संपूर्ण रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त करत, ते उघडकीस आणून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याप्रकरणी आरती रणजीत दमाई, रणजीत दमाई आणि नासिर मुल्ला या तिघांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९, ३२५, २३८, ३ (५) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ ए, ५ बी, ५ सी, ९ ए आणि १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आज (४ जून) मध्यरात्री १ वाजून ४ मिनिटांनी दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!