वीज ग्राहकांना उत्कृष्ठ सेवा देतानाच वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट साध्य करा
सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांचे निर्देश : रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा

चिपळूण : महावितरणकडून अभय योजना, मागेल त्याला सौरपंप, प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज आदी ग्राहक हिताच्या विविध योजना सुरू आहेत. ग्राहक कल्याणाच्या या योजनांमध्ये अधिकाधिक ग्राहक सहभागी व्हावेत, यादृष्टीने काम करा. तसेच ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली करत थकबाकी व चालू बिलाची वसुलीचे उद्दिष्ट साध्य करा, असे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी दिले.
रत्नागिरी जिल्ह्यांतर्गत महावितरणच्या उपविभाग कार्यालय स्तरापर्यंतची आढावा बैठक सोमवारी (१७ मार्च) रोजी महानिर्मिती कंपनीच्या पोपळी, चिपळूण (जि.रत्नागिरी) येथे घेण्यात आली यावेळी दिलीप जगदाळे बोलत होते. यावेळी कोकण परिमंडल रत्नागिरीचे मुख्य अभियंता अनिल डोये, वित्त व लेखा विभागाचे महाव्यवस्थापक अनिल बराटे व रत्नागिरी मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता वैभवकुमार पाथोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


