मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

साखरी-नाटेतील जेटी बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह 

राजापूर : तालुक्यातील साखरी-नाटे येथे सुरू असलेल्या जेटीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत स्थानिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या जेटीच्या कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच पिलर खचल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जेटीचे पिलर खचल्याने हे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप करतानाच सुरूवातीलाच या जेटीचे काम अशा प्रकारे होणार असेल तर मग पुढे ही जेटी टिकणार कशी, असा सवाल आता मच्छीमार आणि स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात साखरी-नाटे तसेच दापोली तालुक्यातील एका जेटीला शासनाची मंजुरी मिळाली आहे. यासाठी शासनाने कोट्यवधीचा निधी मंजूर केलेला आहे. राजापूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशा साखरी-नाटे, धाऊलवल्ली परिसरात या जेटीचे काम सुरू केले आले. जेटी उभारणीसाठी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी सुरुवातीलाच उभारण्यात आलेल्या पिलरपैकी काही पिलर चिखलात खचल्याचे समोर आले असून भरावालाही मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुमारे १०० ते १५० पिलर उभारण्याचे काम सुरू असताना सुरुवातीलाच अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे संपूर्ण जेटी प्रकल्पाच्या कामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिकांच्या मते, मुख्य पिलरच्या कामातच जर त्रुटी दिसत असतील, तर पुढील संपूर्ण जेटीची टिकाऊपणा आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे हे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार बांधव व ग्रामस्थांनी केला आहे.

या बाबत संबधित काम करणाऱ्या ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्यांनी “सदरची जमीन दलदलीची असल्यामुळे काही पिलर खचले आहेत. हा तांत्रिक मुद्दा असून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन पुढील काम अधिक सक्षमपणे केले जाईल,” असे स्पष्टीकरण दिले. मात्र या स्पष्टीकरणाने ग्रामस्थांचे समाधान झाले नसून उलट अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे.

“जर जमीन दलदलीची आहे हे आधीपासूनच माहित होते, तर त्यानुसार मजबूत पाया, तांत्रिक नियोजन आणि आवश्यक उपाययोजना का केल्या नाहीत?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या दाव्यामुळे शंका दूर न होता अधिकच गडद झाल्या आहेत.

याशिवाय, या कामासाठी सुरू असलेल्या दगड-माती वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. अनेक गावांतील रस्ते उखडले गेले असून स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत विचारणा करणाऱ्या ग्रामस्थांना ठेकेदार व अधिकारी हे उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे या ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या कामावर संबंधित विभागाची प्रत्यक्ष देखरेख आहे की नाही, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. निकृष्ट दर्जाचे काम करून जेटी उभारली जात असल्याची भीती व्यक्त होत असून भविष्यात याचा थेट परिणाम मच्छीमारांच्या सुरक्षिततेवर आणि त्यांच्या उपजीविकेवर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

एकूणच, ठेकेदाराच्या स्पष्टीकरणानंतरही परिस्थिती अधिकच संशयास्पद बनली असून कामाचा दर्जा, तांत्रिक अंमलबजावणी आणि प्रशासनाची भूमिका यावर स्पष्टता येणे अत्यंत गरजेचे बनले आहे. अन्यथा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या कामाची चौकशी करावी आणि काम दर्जेदार करावे अशी मागणी स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!