
रत्नागिरी : शहराजवळील रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवा ध्वज व माहिती फलकाची काही महिन्यांपूर्वी अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने त्याच ठिकाणी भगवा ध्वज व माहिती फलक पुन्हा स्थापन करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षभरापूर्वी रत्नदुर्ग किल्ल्यावर असणाऱ्या टेळण्या बुरुजावर गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान मार्फत ग्रामस्थांच्या साहाय्याने ४० फूट उंच असा भगवा ध्वज फडकविण्यात आला होता. ही बाब गडकिल्लेप्रेमींना अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी वाटली होती; परंतु काही अज्ञात समाजकंटकांकडून हा ध्वज वारंवार काढण्यात येत आहे. त्याचबरोबर जानेवारी २०२५ मध्ये रत्नदुर्ग किल्ल्यावर प्रतिष्ठानमार्फत माहिती व सूचना फलक बसविले गेले होते. त्यापैकी महादरवाजा परिसरातील एका फलकाची तोडफोडही अज्ञातांकडून करण्यात अली. या घटनेची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित व्यक्ती स्पष्टपणे दिसत असून, अद्याप पोलिस प्रशासनाकडून योग्यती कोणतीही कारवाई झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान मार्फत पुन्हा एकदा टेळण्या बुरुजावर भगवा ध्वज फडकविण्यात येणार असून, महादरवाजाजवळ फलक ही लावण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम प्रस्तावित असून, येत्या काही दिवसांतच त्याचे नियोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील निवेदन गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानमार्फत भाजपा कार्यालयात जाऊन भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, दादा ढेकणे यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष दीपेश विठ्ठल वारंग, महिला अध्यक्ष मानसी चव्हाण, संपर्क प्रमुख पालवी रसाळ, खुशी गोताड , सलोनी सर्वे, सूरज खोचाडे, सचिन कळंबटे, प्रितम मांडवकर, प्रितम सुर्वे हे दुर्ग रक्षक आणि सेवक सेविका उपस्थित होते.


