कोकणातील विकासकामांबाबत पालकमंत्री उदय सामंत यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा

नागपूर : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन कोकणातील विविध महत्त्वाच्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. विशेषतः मुंबई-गोवा महामार्ग, रस्ते विकास, टोल सवलत आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रलंबित विषयांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
बैठकीत मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच या महामार्गावरील टोल दर कमी करण्याबाबतही सामंत यांनी गडकरी यांच्याकडे मागणी मांडली.
रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटात भूयारी मार्ग उभारण्याच्या प्रस्तावावरही दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण अधिक सुरक्षित व गतिमान होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी ते जयगड, जयगड ते गुहागर तसेच चिपळूण ते सातारा या महत्त्वाच्या मार्गांच्या बांधकामासंदर्भातही चर्चा झाली. या रस्त्यांसाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मंजुरी लवकर मिळावी, अशी मागणी सामंत यांनी केली.
तसेच लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, खेड, दापोली आणि मंडणगड या मतदारसंघांतील विविध विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
कोकणातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरल्याचे सांगितले जात असून, विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



