आगाशे विद्यामंदिरात चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ संस्थेच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ व पालक स्नेहमेळावा नुकताच झाला. या प्रसंगी संस्था सदस्य धनेश रायकर, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, ज्येष्ठ शिक्षिका गीता सावंत, भारती खेडेकर व चौथीचे वर्गशिक्षिक उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सौ. कदम यांनी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतले शिक्षण व नंतर कोरोनामुळे सुरू झालेले ऑनलाइन शिक्षण यातही विद्यार्थ्यांनी चांगली प्रगती केली आहे. संस्था पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन व शिक्षकांनी घेतलेली मेहनत यामुळे विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्यात शाळा यशस्वी झाल्याचे सांगितले.
चौथीच्या विद्यार्थ्यांवर आधारित विविध उपक्रमांची पीपीटी यावेळी सादर करण्यात आली. तसेच शिक्षक, शिक्षिकांनी यशवंत व्हा हे गीत सादर केले. त्यानंतर स्वरा आठल्ये, शौनक गोखले, ओम दाभोळकर, आकाश कुलकर्णी, युवराज कारकर, स्मित कदम, रुद्र जोशी, ओवी सावंत, सोहम भागवत आदी विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये शाळेच्या आठवणी जागवल्या. विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. तसेच पालक सौ. गौरी गोखले, मंगेश कदम, मंजिरी कडव यांनी शाळेतील कामकाजाबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत असल्याबद्दल सांगितले.
पालक प्रा. प्रभात कोकजे म्हणाले की, शाळेत अनेकविध उपक्रम राबवले जात असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. व्यवहार ज्ञानासाठी आनंद बाजार, वाचनासाठी वाचकवीर स्पर्धा, शारदोत्सव, वक्तृत्व, पाठांतर, हस्ताक्षर स्पर्धा असे उपक्रम राबविले जातात. प्रत्येक शिक्षक प्रचंड उत्साही आहे. पालक म्हणून आम्ही शाळेच्या कामकाजाबद्दल अत्यंत समाधानी आहोत.
याप्रसंगी इयत्ता चौथीच्या तीन वर्गांच्या पालकांनी भेटवस्तू व आर्थिक रक्कम सुपूर्द केली. वर्गशिक्षिका सौ. सुरभी सावंत, सौ. ज्योत्स्ना सागवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. जानकी घाटविलकर यांनी पटवर्धन हायस्कूलमधील प्रवेश प्रक्रिया, गुरुकुल प्रबंधक सौ. मनाली नाईक यांनी गुरुकुलविषयी माहिती दिली. शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर आणि उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सौ. मंजिरी गुणे यांनी सूत्रसंचालन केले. सौ. चारुशीला पेठे यांनी आभार मानले.



