सलग २७ दिवस २७ मेणबत्या लावून रत्नागिरीकर करणार शोक व्यक्त
२७ मृत पर्यटकांना वाहणार श्रद्धांजली : भ्याड हल्ल्याचा निषेध

रत्नागिरी : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा आणि पर्यटकांची झालेली निर्घृण हत्या याच्या निषेधार्थ रत्नागिरीकरांच्या वतीने शहरातील जयस्तंभ येथे आजपासून (२४ एप्रिल) सलग २७ दिवस सायंकाळी ६ वाजता २७ मेणबत्त्या लावून शोक केला जाणार असून, हल्ल्यात निष्पाप बळी गेलेल्या २७ पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
२२ एप्रिल रोजी दुपारी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. यात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील मिळून २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचा रत्नागिरीतील जनता निषेध करत आहे.
हा सरकार निर्मित हा भ्याड हल्ला असून, हा हल्ला म्हणजे जनतेच्या जीवनाचे संरक्षण करण्यात सरकारला आलेले अपयश आहे. मोठ्या मोठ्या बाता मारून जनतेच्या जीविताला हानी पोहोचली, तरी समाजात तेढ निर्माण करून जातीय दहशतवाद निर्माण केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या कुटील नीतीच्या जाहीर निषेधार्थ जयस्तंभ येथे सायंकाळी ६ वाजता २७ मृत पर्यटकांना सलग २७ दिवस २७ मेणबत्त्या लावून रत्नागिरीकर शोक व्यक्त करणार असून, मृतांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त रत्नागिरीकरांच्या वतीने दीपक राऊत यांनी केले आहे.



