मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने कृती आराखडे बनविण्याच्या राजापूर प्रांताधिकाऱ्यांच्या सूचना

राजापूर : आगामी पावसाळी हंगामात अतिवृष्टी होऊन नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजना व खबरदारीच्या अनुषंगाने नैसर्गिक आपत्ती कृती आराखडे बनविण्याच्या सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा राजापूर उपविभागीय अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी राजापूर लांजा तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी नैसर्गिक आपत्ती अनुषंगाने मौलिक मार्गदर्शन केले.

राजापूर उपविभागातील राजापूर व लांजा तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई व आगामी पावसाळी हंगामातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती अनुषंगाने दोन्ही तालुक्यातील तहसीलदार व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक उपविभागीय अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी कार्यालय राजापूर येथे पार पडली. यावेळी त्यांनी राजापूर शहरातील अर्जुना नदीपात्रातील काढण्यात आलेला गाळ पावसाळयापुर्वी नदीपात्राबाहेर हलविण्यात यावा तसेच वरचीपेठ येथील नव्या पुलाखालील नदीपात्रात टाकण्यात आलेला गाळ पावसाळयापुर्वी काढण्याच्या सूचना संबधीत विभागाना देण्यात आल्याची माहिती डॉ. जॅसमिन यांनी दिली.

या बैठकीला राजापूर तहससी लदार विकास गंबरे, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, गटविकास अधिकारी निलेश जगताप यांसह विविध खात्यांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी महावितरण, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण विभागांना पावसाळयात सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तर नगर परिषद, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस प्रशासन यांनी संयुक्त आढावा बैठका घेण्याच्या सूचना डॉ. जॅसमिन यांनी केल्या.

राजापूर शहराला पावसाळयात भेडसावणाऱ्या पूर समस्येबाबत व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी निवेदन केले. त्या अनुषंगाने नदीपात्रातील गाळ नदीपात्राबाहेर नेण्याबाबत तसेच नविन पुलाखालील गाळ पावसाळयापुर्वी काढण्याबाबतच्या सूचना डॉ. जॅसमिन यांनी दिल्या. तसेच पूरस्थिती उद्भवल्यास आवश्यक त्या उपाययोजनांसाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत नगर पालिका प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना करताना कृती आराखडा बनवून सादर करण्याचे निर्देश दिले.

पावसाळयात उद्भवणाऱ्या वीज विषय समस्यांबाबत महावितरणला आवश्यक त्या पावसाळापूर्व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच पावसाळ्यात अणस्कुरा घाटात निर्माण होणाऱ्या आपत्तकालीन परिस्थितीबाबत तसेच धारतळे आडिवरे रस्त्यावरील झाडी तोडणे व मार्गदर्शक सूचना फलक याबाबत आवश्यक त्या उपाय योजना याबाबत कृती आरखडा सादर करावा अशा सूचना केल्या. त्याचबरोबर लांजा तालुक्यात अंजणारी भागात होणाऱ्या संभाव्य अपघाताबाबत उपाय योजनांबाबत घ्यावयाच्या खबरदारी याविषयी सूचना केल्या. तसेच पावसाळयात धरणे व धबधब्यांच्या ठिकाणी जिवीत हानी होवू नये म्हणून आवश्यक त्या उपाय योजना हाती घेण्याबाबत जलसंधारण विभागाला सूचना केल्या. त्याचबरोबर ग्रामीण भागात धोकादाय झाडे, घरे, इमारती याबाबत आढावा घेवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

राजापूर चिखलगाव मार्गावर नवीन पुलाखालील धोकादायक साईडपट्टी बाबत उपस्थित प्रश्नाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित विभागाला आवश्यक ती दुरूस्ती करण्याबाबत निर्देश दिले जातील, असे डॉ. जॅसमिन यांनी सांगितले. तसेच यावेळी संभाव्य पाणीटंचाईबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!