गावखडीतील श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री महोत्सवानिमित्त भाविकांची अलोट गर्दी
गावखडी : “ओम नमः शिवाय”चा जप आणि “हर हर महादेव” अशा गर्जना करत हजारो शिवभक्तांंनी महाशिवरात्रीनिमित्त येथील श्री देव रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे श्रीदेव रामेश्वराचे जागृत देवस्थान असून, नवसाला पावणारा रामेश्वर अशी ख्याती असल्याने रत्नागिरीसह मुंबई, पुणे राजापूर आदी ठिकाणांहून माहेरवाशिणी आणि भाविक गावखडी येथे उत्सवानिमित्त गेले पाच दिवस गावी आले आहेत.

छाया = दिनेश पेटकर गावखडी
आज महाशिवरात्री दिवशी या मंदिरात ११ खांबांची आणि २१ पायली तांदळाची महापूजा बांधण्यात येते. ही महापूजा बांधण्यासाठी भक्तगण मोठ्या भक्तीभावाने तांदूळ देतात. अशी महापूजा इतरत्र पहावयास मिळणे दुर्मिळ आहे. ही तांदूळाने बांधलेली महापूजा भक्तगणांची आकर्षण असते.
याबरोबरच महाशिवरात्री महोत्सवानिमित्त गेले पाच दिवस विविध क्रीडा स्पर्धा, विविध नाट्य प्रयोग, भजन, कीर्तन, पालखी सोहळा, आरती असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सतत पाच दिवस म्हणजे १२० तास हा शिवरात्री महोत्सव गावखडी श्रीदेव रामेश्वर मंदिरात साजरा केला जातो. या उत्सवानिमित्त यावर्षी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. त्यामुळे श्री क्षेत्र गावखडी भक्तीरसात चिंब भिजून गेली आहे.

गावखडीतील श्रीदेव रामेश्वराचा शिवरात्री महोत्सव मोठ्या थाटात आणि भक्तीमय वातावरणात पार पडण्यासाठी श्री देव रामेश्वर उत्सव मंडळाचे अध्यक्ष रविकिरण धर्माजी तोडणकर, श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष पद्माकर तोडणकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व शिवभक्त, ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने मेहनत घेत आहेत.



