मुंबई येथे १७ डिसेंबरला १३३ वी डाक अदालत

रत्नागिरी : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्यावतीने १७ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता मुंबई येथे १३३ वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाकसेवा (ग्राहक संतुष्टी) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, यांचे कार्यालय, मुंबई एनेक्स बिल्डिंग, जी.पी.ओ. इमारत, चौथा माळा, मुंबई ४००००१ यांचे नावे दोन प्रतिसह १ डिसेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे अधीक्षक डाकघर, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तु /मनीऑर्डर / बचत बँक खाते / प्रमाणपत्र इत्यादि बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव हुद्दा इत्यादि. ही डाक अदालत दुसरा मजला, जी. पी. ओ. इमारत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे होईल.



