राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबई : एकीकडे उन्हाच्या काहिलीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विदर्भ, मराठवाड्यात पाऱ्याने ४५ शी गाठली आहे. दुपारी तर घराबाहेर पडणंही कठीण झालं असताना राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.
पालघर, मुंबई, ठाणे जिल्ह्याला आजपासून (४ मे) तीन दिवस पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. रविवार, सोमवार आणि मंगळवार (४ ते ६ मे) या तीन दिवसांत दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तुरळक ठिकाणी पावसासोबत तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वारे आणि विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाट होऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा (घाट परिसर), संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट नसला तरी येथे हलक्या सरी बरसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



