पावणे दोन वर्षांच्या वेदा सरफरेची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डपर्यंत मजल
देशातील सर्वांत लहान जलतरणपटू

रत्नागिरी : रत्नागिरीच्या अवघ्या पावणेदोन वर्षांच्या चिमुरडीने वयाच्या केवळ नवव्या महिन्यापासून पाण्याशी मैत्री करत इंडियन बुक ऑफ रेकॉर्डपर्यंत मजल मारली आहे. केवळ गंमत म्हणून नवव्या महिन्यात पाण्यात पाय मारणाऱ्या वेदा परेश सरफरे या १ वर्ष नऊ महिन्यांच्या चिमुरडीने १०० मीटरचे अंतर १० मिनिटे आणि ८ सेंकदात पूर्ण करत हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरण पटू बनण्याचा मान पटकावला आहे. तिच्या या कामगिरीने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
नऊ महिन्यांची असताना वेदा बाकीच्या मुलांसारखे रडणे विसरून शासकीय जलतरण तलावात पोहणे शिकत होती. वेदाचा मोठा भाऊ रूद्र शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो. तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे. रूद्रला घेऊन आई पायल सरफरे या जलतरण तलावावर यायच्या त्यावेळी त्यांच्या कंबरेवर बसून वेदा हे तलावातील पोहणं पहायची. जलतरण तलावाचे वातावरण तिला एवढे सवयीचे झाले की, प्रशिक्षक महेश मिलके यांनी एकदा धाडस करून तिला पाण्यात सोडले. आश्चर्य म्हणजे, ती रडली नाही, तर उलट, तिने पाण्यावर हातपाय मारून पाण्याशी जवळीक साधली आणि हळूहळू ती पोहायला लागली.
अवघ्या दीड वर्षांच्या आत राष्ट्रीय विक्रमापर्यंत पोहोचलेली वेदा केवळ रत्नागिरीचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची सर्वांत लहान जलतरणपटू ठरली आहे. यापूर्वी जगात असा रेकॉर्ड करणाऱ्या बालकामध्ये जपानमधील २ वर्ष ७ महिन्यांच्या बालकाचा समावेश होता. त्यामुळे रत्नागिरीच्या वेदाचा हा रेकॉर्ड जागतिक स्तरावरही अव्वल ठरणार आहे.
वेदाच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर तिचा प्रस्ताव आता एशिया बुक रेकॉर्डसाठी देखील पाठवण्यात आला आहे. तसेच, गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डसाठीही लवकरच तिची नोंद होण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे प्रशिक्षक महेश मिलके यांनी सांगितले. योग्य वेळी मिळालेले प्रशिक्षण, पालकांचा पाठिंबा आणि प्रशिक्षकांची अचूक नजर यामुळे कोणतेही अवघड काम यशस्वी होऊ शकते, हेच या चिमुकलीने सिद्ध केले आहे. वेदाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.



