आडवली येथे कोकण रेल्वे मार्गावर दरड; वाहतूक सेवा सुरू

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर आडवली येथे दरड कोसळल्याने रेल्वे सेवा दोन तासांपासून बंद होती; परिणामी, प्रवाशांच्या गाड्या थांबवण्यात आल्या होत्या; मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर ८ वाजून २० मिनिटांनी रेल्वे वाहतूक सुरू झाली. दरम्यान, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर रेल्वेच्या एकामागोमाग रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवासी अस्वस्थ झाले होते, त्यांना कोणतीही स्पष्ट माहिती न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
हवामान विभागाने मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याचा इशारा आधीच दिला होता. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहता अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आज सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. मात्र, दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि संपूर्ण जिल्ह्याला हलवून टाकले.
कोकण रेल्वे प्रशासनाकडून मार्ग लवकरात लवकर मोकळा करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे प्रशासनाला दरड दूर करण्यात यश आले. अखेर ८ वाजून २० मिनिटांनी रेल्वे मार्गावरील दरड दूर झाल्यानंतर थांबविलेल्या रेल्वे मार्गस्थ करण्यात आल्या.


