ठाकरे शिवसेनेकडून मुंबई-गोवा महामार्गाचे अधिकारी आणि ठेकेदार धारेवर
येत्या दोन दिवसांत सर्व्हिस रोडसह वाहतूक सुरळीत न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य, रस्त्याची दुर्दशा आणि वाहतुकीचा खोळंबा यावरून लांजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागणीवरून तहसीलदारांनी बोलवलेल्या बैठकीत महामार्गाच्या अधिकारी आणि ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले. येत्या दोन दिवसात सर्व्हिस रोडसह वाहतूक सुरळीत करा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. यावेळी लांजा नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारण्यात आला.
लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील रस्त्याची झालेली दुर्दशा, चिखलाची साम्राज्य आणि वाहतुकीचा खोळंबा या समस्येबाबत निवेदन देऊन बैठक बोलावण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे लांजा तहसीलदार यांनी बुधवारी (२८ मे) रोजी सायंकाळी ४ वाजता ही बैठक तहसीलदार कार्यालयात बोलावली होती.

या बैठकीत शिवसैनिकांनी महामार्गाच्या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. ठेकेदार कशा पद्धतीने चुकीचे काम करत असल्याचे सांगण्यात आले. तसेच ठेकेदार पावसाळ्याच्या तोंडावर काम करत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून देत अनेक प्रश्न उपस्थित करत महामार्गाच्या अधिकारी व ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ठेकेदाराला अक्षरश: घाम फोडला.
जोपर्यंत सर्व्हिस रोडचे काम होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवावे अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. जोपर्यंत सर्व्हिस रोडचे काम होत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये अशी मागणी लावून धरली कारण महामार्गाच्या ठेकेदाराकडून शहराची अशी परिस्थिती निर्माण करून ठेवण्यात आली आहे की त्या रस्त्याने नागरिकांना चालणे देखील कठीण झाले असल्याने सर्वप्रथम सर्व्हिस रोडचे काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
या बैठकीत महामार्गाच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला शिवसैनिकांनी अक्षरशः धारेवर ठरलेले असताना तहसीलदार मात्र आपण वेळोवेळी पत्रव्यवहार केलेली सर्व निवेदने आपण संबंधित कार्यालयाला पाठवून दिली असल्याचे सांगून आपण यापुढे महामार्ग अधिकाऱ्यांनाच विचारावे, असे सांगून या प्रकरणी हात झटकण्याचा प्रयत्न करत होत्या; परंतु संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तहसीलदार यांना देखील आपण लांजा तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी आहात आपण याबाबत आदेश देऊ शकता कारण सध्या परिस्थिती काय याची संपूर्ण कल्पना आपल्याला आहे असे असताना आपल्याला जबाबदारी झटकता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर मात्र तहसीलदार यांनी संबंधित महामार्गाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना यावर आपण तातडीने उपाययोजना काय करता येईल याबाबत आपण वरिष्ठांची चर्चा करावी, असे सांगितले.
शेवटी संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर येत्या दोन दिवसांत पाऊस थांबला तर सर्व्हिस रोडचे तातडीने काम करून दिले जाईल आणि महामार्गावर उड्डाणपुलाचे काम थांबवून रस्त्यालगतचे लोखंडी पोल ताबडतोब हटवून देण्याचे सांगण्यात आले. तसेच राम पुलाजवळ सुरू आलेले काम २४ तासांमध्ये पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच शिवसैनिक शांत झाले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक व उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, शिवसहकार सेनेचे जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, शिवसहकार सेनेचे जिल्हा समन्वयक परवेश घारे, तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, महिला तालुकाप्रमुख पूर्वा मुळे, मा. नगरसेवक लहू कांबळे, विभाग प्रमुख युवराज हांदे, उपविभागप्रमुख राजेंद्र सुर्वे, उपविभाग संघटक राजेंद्र घडशी, सरपंच पुनस संतोष लिंगायत, सरपंच कोंडये मनोज चिंदरकर व उपसरपंच सुनील नाटेकर, भालचंद्र बोडस, भालचंद्र लाड, पप्पू मुळे, अभिजीत राजेशिर्के, प्रकाश लांजेकर, दिलीप मुजावर, श्रीकृष्ण हेगिष्टे, नितीन शेट्ये, सचिन लिंगायत, मोहन तोडकरी, चंद्रशेखर धावणे, दाजी गडहिरे यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



