रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे कायदेविषयक व महिला जनजागृती कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे दिनांक २० मे ते २४ मे या कालावधीत कायदे विषयक व महिलांप्रती जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
लांजा तालुक्यात २० मे रोजी व्हेळ ग्रामपंचायत, २१ मे रोजी वाटुळ, २२ मे रोजी काळे छात्रालय, लांजा व महिला आश्रम, लांजा, तर २४ मे रोजी तळवडे ग्रामपंचायत, लांजा येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील आणि महिलांमधील कायदेशीर जागरूकता वाढवणे व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सक्षम करणे हा होता. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना व ग्रामस्थांना महिलांचे मूलभूत हक्क, कायदे, संरक्षणासाठीच्या तरतुदी तसेच शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात तज्ज्ञ व्यक्तींनी महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारी विषयक कायदे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपलब्ध शासकीय योजनांवर मार्गदर्शन केले. याशिवाय, सहाय्य कसे मिळवावे याबाबत देखील माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात कायदासाथी म्हणून नंदिनी चव्हाण, विक्रांत घाग, धर्म मेटकरी आणि विदिशा जाधव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी गावोगावी जाऊन कायद्यासंबंधी जनजागृती केली. त्यांच्या अमूल्य कार्याबद्दल त्यांचा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
२२ मे या दिवशी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाचे औचित्य साधून कृषी, कामगार व महिला यांच्यासाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये कृषी व कामगार विषयक कायदे आणि महिलांसाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सचिव माणिकराव सातव, लांजाचे गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, तहसीलदार प्रियांका ढोले, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, ॲड. मंदार बंडबे (लांजा), ॲड. अमित शिरगावकर (रत्नागिरी), बांधकाम कामगार अध्यक्ष अशोक गुरव, लांजा तालुका कृषी अधिकारी अभिजीत शेलार उपस्थित होते. हा कार्यक्रम काळे छात्रालय, लांजा येथे पार पडला आणि याला सुमारे १५० लोक उपस्थित होते.
श्री. सातव साहेब म्हणाले की, “विधी सेवा प्राधिकरण हे लोकांसाठी आहे आणि त्यांची माहिती व मदत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्राधिकरण नेहमी तत्पर राहील.”
या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक न्यायाची पाळेमुळे ग्रामीण स्तरावर रुजत आहेत. सर्व ग्रामस्थांनी असे कार्यक्रम पुन्हा घ्यावेत अशी मागणी केली.



