मुख्य बातमी
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मध्यरात्रीपासून पुन्हा सुरळीत
सुरक्षेच्या कारणास्तव तब्बल १७ तास महामार्ग बंद

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर काल (८ जून) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एलपीजी टँकर आणि मिनी बस यांच्यात झालेल्या अपघातानंतर निवळी घाटातील वाहतूक दिवसभर ठप्प होती; मात्र रात्री दीड वाजण्याच्या सुमारास महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. वाहतूक तब्बल १७ तास पूर्णपणे बंद असल्यामुळे उक्षी या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात आला होता; मात्र तेथेही वाहतूक जास्त झाल्याने या मार्गावरही गाड्यांची मोठी रांग लागलेली दिसली.
अपघातानंतर टँकरमधील गॅस बाहेर काढण्याचे आणि शिफ्टिंगचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सुरक्षेच्या कारणास्तव रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. सर्व संबंधित खात्याच्या अविरत प्रयत्नांमुळे आणि समन्वयामुळे अखेर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे.


