मुख्य बातमी

उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी लाच घेणारा तलाठी “लाचलुचपत”च्या जाळ्यात 

रत्नागिरी : उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना रत्नागिरीच्या केळशी सजा येथील ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) राजेंद्र उंडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज (१० जून) दुपारी २.३० वाजता ही कारवाई करण्यात आली असून, उंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एसीबी रत्नागिरी युनिटला एका ४९ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली होती की, त्यांचा उत्पन्नाचा दाखला मंजूर करण्यासाठी ग्राममहसूल अधिकारी राजेंद्र उंडे (सजा केळशी, अतिरिक्त कार्यभार मांदिवली) २० हजार रुपयांची लाच मागत आहे. ही तक्रार ५ जून २०२५ रोजी प्राप्त झाली होती. त्याच दिवशी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली आणि उंडे याने २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. आज पंचांसमक्ष ग्राममहसूल अधिकारी उंडे याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

ही यशस्वी सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक फौजदार चांदणे, पोहवा संजय वाघाटे, पोहवा विशाल नलावडे, महिला पोहवा श्रेया विचारे, पोहवा दीपक आंबेकर, पोकॉ हेमंत पवार, पोकॉ राजेश गावकर, महिला पोकॉ समिता क्षीरसागर आणि चा. पोना प्रशांत कांबळे यांनी पार पाडली.

ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोवीलकर, सुहास शिंदे आणि रत्नागिरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!