मुख्य बातमी

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी शिल्पा सुर्वे

शाखेतर्फे बाल साहित्य संमेलन भरवणार

रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (पुणे) रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी माजी नगरसेविका सौ. शिल्पा प्रशांत सुर्वे यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी लेखक अनिल दांडेकर, सचिव म्हणून ॲड. श्रीकांत भाटवडेकर आणि खजिनदारपदी श्रीकृष्ण तथा सतीश दळी यांची निवड झाली. शाखेच्या सभेमध्ये ही सर्वानुमते निवड केली असून वर्षभरातील विविध कार्यक्रमांची आखणी या वेळी करण्यात आली. यामध्ये बाल साहित्य आणि विविध स्पर्धा, उपक्रम याविषयी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली.

हॉटेल विवेकच्या हॉलमध्ये झालेल्या या सभेची सुरवात पहलगाम हल्ल्यातील निष्पाप भारतीय, सैनिक आणि दिवंगत साहित्यिकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळामध्ये सदस्य म्हणून राजेंद्र कदम, मनोहर जोशी, संजीव लिमये, महेश सामंत, डॉ. चित्रा गोस्वामी, सौ. राधिका चव्हाण, सौ. मनाली नाईक, पांडुरंग बर्वे, आणि पंकज शिंदे यांनी निवड करण्यात आली.

निवड झाल्यानंतर अध्यक्ष शिल्पा सुर्वे म्हणाल्या की, शाळेतील लहान मुलांसाठी बाल साहित्य संमेलन या वर्षी आयोजित करू. त्यादृष्टीने समिती गठित करून नियोजन करूया. महिन्यातून एकदा सभा घेऊन कार्यक्रमांची आखणी करू. मराठी भाषा दिन, रत्नागिरी जिल्ह्यातील साहित्यिकांचे स्मरण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करू.

कार्याध्यक्ष अनिल दांडेकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्यात आल्या. दिवंगत प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनीही या शाखेसाठी योगदान दिले आहे. राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे शाखेकरिता नेहमी सहकार्य, योगदान राहिले आहे. रत्नागिरीमध्ये साहित्यिक, लेखकांची सूची बनवण्याचा शाखेतर्फे विचार सुरू आहे. सचिव ॲड. भाटवडेकर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!