रत्नागिरी जिल्हा पोलिस दलामध्ये ११२ नव प्रविष्ट पोलिस शिपाई हजर

रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलामार्फत १० ऑक्टोबर २०२४ रोजी बाभळगाव (जि. लातूर) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे ६६ पुरुष नव प्रविष्ट पोलीस शिपाई, तुरची (जि. सांगली) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे ४५ महिला नव प्रविष्ट पोलीस शिपाई तसेच ११ डिसेंबर २०२४ रोजी नव प्रविष्ट पोलिस शिपाई, चालक पोलिस प्रशिक्षण केंद्र, नाणविज, दौंड येथे मूलभूत पोलिस प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आलेले होते. आपल्या मूलभूत पोलिस प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करून सर्व ११२ नव प्रविष्ट पोलीस शिपाई १० जून रोजी रत्नागिरी पोलिस मुख्यालय येथे हजर झाले.

या प्रसंगी पोलिस अधीक्षक कार्यालय येथे, जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी या सर्व नव प्रविष्ट पोलिस शिपाई यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी सर्वांना आपल्या कर्तव्याप्रती समर्पण आणि शिस्त राखणे, सोशल मीडियावर योग्य वर्तन राखणे, योग्य व स्मार्ट पोलिसिंग करणे आणि सर्व प्रकारची कर्तव्ये पार पाडण्याबाबत व उपग्रेड होण्याबाबत अवगत केले. वेळोवेळी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश प्राप्त करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिला नव प्रविष्ट पोलिस शिपाई श्रीमती कोमल सावते यांचे पोलिस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे “सर्वोत्तम कमांडो कोर्स प्रशिक्षणार्थी” व महिला नव प्रविष्ट पोलीस शिपाई श्रीमती अंजली यादव यांना “सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय प्रशिक्षणार्थी” म्हणून ट्रॉफी संपादन केल्याबद्दल विशेष अभिनंदन केले.

या वेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. गायकवाड यांनी देखील सर्व नव प्रविष्ट पोलिस शिपाई यांना रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाचे नाव आपल्या कर्तुत्वातून उचवण्याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी पोलिस उपअधीक्षक (पो. मुख्यालय) श्रीमती राधिका फडके, राखीव पोलिस निरीक्षक, पोलिस मुख्यालय राजेंद्र कुळसंगे, पोलीस अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी, पोलिस कवायत प्रशिक्षक पोलिस हवालदार श्री. सावंत, पोलिस हवालदार श्री. सार्दळ व अंमलदार उपस्थित होते.


