रत्नागिरीमधील अनेक होर्डिंग हटवली; मनसे मोर्चाचा इम्पॅक्ट
आता राजीवडा येथील मच्छिमार्केट बाबतीत पाहणी करून मनसेची नागरिकांसोबत चर्चा

रत्नागिरी : “अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात, नगरपरिषदच्या दारात” या दणदणीत मोर्चाद्वारे मनसेने पालिका अधिकाऱ्यांच्या सोईच्या कारभारावर बोट ठेवून नूतन मुख्याधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला होता. त्यावेळी दिलेल्या पत्रात मनसेने अनधिकृत होर्डिंगसह अनेक गोष्टीवर तिखट प्रश्न पुराव्यासह विचारले होते. त्यानंतर मुख्याधिकारी यांच्या भेटीमध्ये देखील मनसेने सर्व शहरातील अनेक गैरसोई पुराव्यासह मुख्याधिकारी यांना दाखवून दिल्या. मुख्याधिकाऱ्यांनी सोमवारपासून बदल होताना दिसू लागतील, असे सांगितले होते. त्याप्रमाणे मोर्चाच्या दुसऱ्या दिवसापासूनच शहरातील अनधिकृत होर्डिंग हटवायला सुरवात केली होती.

त्यानंतर राजीवडा येथील विषय देखील मनसेकडून हातात घेण्यात आला आहे. मत्स्य विभागमार्फत राजीवडा जेटी येथे सुसज्ज अशी शेड बांधण्यात आली आहे. तिथे मासे विक्री करणाऱ्या महिला न बसता शिवखोल घाटीच्या पायथ्यापासूनच्या रस्त्यावर विक्रीसाठी बसतात. त्याचा त्रास तेथे राहणाऱ्या नागरिकाना होत असल्याबाबतीत एक पत्र मनसेला प्राप्त झाले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने राजीवडा येथील मच्छिमार्केटमधील आरक्षित भूखंड व रस्त्यावर होणाऱ्या मासे विक्री विषयी मनसेने काल (१८ जून) नगरपालिका अधिकारी, मेरिटईम बोर्ड, मत्स्य विभाग, व स्थानिक नागरिक यांच्यासोबत संयुक्त पाहणी केली. या पाहणी दरम्यान असे दिसून आले की स्वतंत्र शेड बांधलेली असून तिथे मच्छि विक्री व्यवसाय न करता तेथील महिला रस्त्यावर बसून मच्छि विक्री करतात आणि त्या बांधून तयार असलेल्या शेडमध्ये मासेमारीचे साहित्य साठवून ठेवले आहे. ज्यामुळे संपूर्ण रस्ता अडून जातोय. या रस्त्यावरून एखादा रुग्ण घेऊन जायचा असेल, तर जाणे अशक्य होईल. त्यासोबत व्यवसाय बंद करून घरी जाताना जागा अडवण्यासाठी उरलेले मच्छि विक्रीचे साहित्य, साठवणचे बॉक्स इत्यादी सामान तसेच रस्त्याच्या कडेला लावून ठेवून जातात.

याबाबत मनसेच्या वतीने सचिन शिंदे, अरविंद मालाडकर, महेंद्र गुळेकर व बाबय भाटकर यांनी तेथील नागरिकांना तसेच मच्छि विक्री करणाऱ्या महिलांना समजावून ज्यांनी साहित्य ठेवून जागा अडवली आहे त्यांनी स्वतः ते साहित्य दोन दिवसात हलवून घ्यावे व रस्त्यावर बसणाऱ्या महिलांची सोय त्या शेडमध्ये करावी अशी विनंती केली. तसेच शेडची काही ठिकाणी दुरावस्था झाली आहे त्याची तात्काळ दुरुस्ती करावी लागेल, असे मत्स्य विभाग मेरिटईम बोर्ड तसेच नगरपालिका अधिकारी यांच्यादेखील निदर्शनास आणून देण्यात आले.
याबाबत शेडच्या बाजूला भराव करून शेडच्या विस्ताराबाबतीत तसेच अधिक काही मागणी असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरच घेऊ, असे देखील आश्वास्त करण्यात आले. यावेळी मनसेतर्फे अरविंद मालाडकर, सचिन शिंदे, महेंद्र गुळेकर, बाबय भाटकर, महिला शहर सचिव संपदा राणा, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम, शहर सचिव गौरव चव्हाण, नगरपालिका, मेरिटईम व मत्स्य खात्याचे अधिकारी व राजीवडा येथील अनेक नागरिक उपस्थित होते.



