रत्नागिरी शहरात खड्डे आणि मोकाट गुरांचा उपद्रव
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे, मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव यामुळे रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत. या समस्यांकडे नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज (२५ जून) प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव गारवे यांना निवेदन दिले आहे. जर या समस्यांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
रत्नागिरी शहरातील मारुती आळी, तांबट आळी, तेली आळी नाका तसेच अन्य अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. हे खड्डे चिरा डबर न टाकता, पावसाळी डांबर वापरून त्वरित भरले जावेत. या सोबतच, शहरातील मोकाट गुरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा त्रासही गंभीर बनला आहे. रस्त्यांवर फिरणारी जनावरे वाहतुकीस अडथळा निर्माण करत असून, अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. तसेच भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या दोन्ही समस्यांवर तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेनेने निवेदनातून केली आहे.
“आज या गंभीर समस्यांबाबत प्रशासनाला सूचित करण्यात आले आहे. जर रस्त्यावरील खड्ड्यांचा, मोकाट गुरांचा आणि कुत्र्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लागला नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नगर पालिकेने या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे. या इशाऱ्याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी, असे आवाहनही शिवसेनेने केले आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा, असे शिवसेनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, माजी नगरसेविका सौ. रशिदा गोदड, माजी नगरसेविका सौ. राजश्री शिवलकर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



