मुख्य बातमी

अमली पदार्थ बाळगणारा एकजण आलोरे शिरगांव पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी : अलोरे शिरगांव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोफळी टीआरटी धनगरवाडी (ता. चिपळूण) येथे अमली पदार्थ विक्री करण्याकरता आलेल्या एकाला अलोरे शिरगांव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राया खरात (वय ३९ वर्षे, रा. पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी ता. चिपळूण) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून १४ हजार रुपये किंमतीचा ५८८ ग्रॅम वजनाचा “गांजा” अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आज त्याच्यावर अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने अलोरे शिरगांव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील यांना २७ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गोपनीय बातमीदारामार्फत पोफळी टीआरटी धनगरवाडी (ता. चिपळूण जि. रत्नागिरी) येथे एक इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाली.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अलोरे शिरगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांनी त्यांच्यासोबत पोलिस हेड कॉन्स्टेबल गव्हाणे, पोलिस हेड कॉन्स्टेबल यादव, पोलिस कॉन्स्टेबल जगदाळे, पोलिस कॉन्स्टेबल फडतरे, पोलिस कॉन्स्टेबल माने, एस. एम. लोटे ग्रेड पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हेड कॉन्स्टेबल शेख, महिला पोलिस कॉन्स्टेबल श्रीमती मुल्ला असे पथक व दोन पंचासह या ठिकाणी जाऊन चौकशी केली. यात गांजा विक्री करणारा इसम संजय राया खरात (वय ३९, रा. पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी ता. चिपळूण) याच्या ताब्यातून१४ हजार रुपये किंमतीचा ५८८ ग्रॅम वजनाचा “गांजा” हा अमली पदार्थ जप्त करून ताब्यात घेण्यात आलेले आहे व त्याच्या विरोधात अलोरे शिरगांव पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कायदा कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) अन्वये आज (२८ जून) दुपारी ३.३८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अलोरे शिरगांव पोलीस ठाणे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक भरत पाटील व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!