मुख्य बातमी

शनिवार घातवार : तीन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू, तर चार जखमी 

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा हायस्कूल समोरील वळण,निवळी आणि हातखंबा-झरेवाडी येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू आणि चार जण जखमी झाले. अपघाताची ही घटना आज (२८ जून) रोजी सकाळी ९.३० ते १०.१५ वाजण्याच्या कालावधीत घडली आहे. त्यामुळे शनिवार हा घातवार ठरला आहे.

पहिल्या अपघातात हातखंबा हायस्कूलसमोरील वळणात अज्ञात वाहनाच्या धडकेत मंगेश मधूकर भस्मे (४२, रा.पाली-गराटेवाडी, रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ते आपल्या ताब्यातील अ‍ॅक्सेस दुचाकी (एमएच-०८-एएल-०६७०) वरून पाली ते रत्नागिरी असे येत होते. ते हातखंबा हायस्कूलसमोरल वळणात आले असता समोरून येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकील समोरुन जोराची धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मंगेश भस्मे यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची दुसरी घटना ही शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास निवळी येथील वॉटर स्पोर्टच्या अलीकडील वळणात घडली. यातील फिर्यादी व जखमी रवींद्र गोविंद पाचकुडे (४३, रा.करबुडे-पाचकुडेवाडी, रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील दुचाकीवर (एमएच-०८-पी-४४१२) पाठीमागे पत्नी अस्मिता पाचकुडे हिला बसवून करबुडे ते रत्नागिरी असे येत होते. ते निवळी येथील वॉटर स्पोर्टच्या अलीकडील वळणात आले असता समोरुन येणारा ट्रेलर (केए-२२-डी-५३०३) वरील चालकाने रस्त्याच्या उजव्या बाजूला येत त्यांच्या दुचाकीला धडक देत अपघात केला. यात पाचकुडे दांपत्य दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने रवींद्र पाचकुडे यांच्या डोक्याला, हातांना गंभीर दुखापत झाली, तर त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली.

अपघाताची तिसरी घटना शनिवारी सकाळी १०.५० वाजण्याच्या सुमारास हातखंबा-झरेवाडी येथे घडली. या अपघातातील दुचाकी चालक पियूष प्रेमकुमार भारती (१९, रा. खेडशी-गयाळवाडी, रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील युनिकॉर्न दुचाकी (एमएच-०८-एवाय-०२८६) वर पाठीमागे त्याचा मित्र ॠषीकेश शिवराम बावधने (२४, रा. पांगरी, रत्नागिरी) याला सोबत घेऊन माचाळला फिरण्यासाठी जात होते. ते झरेवाडी स्टॉपजवळील वळणात आले असता पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणारा ट्रक (जीजे-०३-बीव्ही-०१०८) ला त्याने धडक देत अपघात केला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, अपघाताच्या तिन्ही घटना ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी तिन्ही ठिकाणच्या अपघातांचा पंचनामा करून हातखंबा हायस्कूल अपघातातील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तसेच निवळी आणि झरेवाडी येथील एकूण चार जखमींना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघातांची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!