ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलमध्ये वर्षारंभ, संकल्प दिन आणि वी गुणगौरव समारंभ उत्साहात

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी लहान वयातच आपले ध्येय निश्चित करून त्या वाटेवर मार्गक्रमण करावे आणि जीवनात यशस्वी व्हावे यासाठी मनाशी एक संकल्प करणे महत्त्वाचे आहे. रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेच्या ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलमधील इयत्ता पाचवी ते दहावीमधील विद्यार्थी दरवर्षी एक संकल्प करतात. २८ जून रोजी वर्षारंभाच्या निमित्ताने गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी दररोज एक पुस्तक वाचेन, नियमित खेळ खेळेन, पाढे न चुकता पाठ करेन, सुंदर हस्ताक्षर, चित्र काढणे, इंग्रजी पुस्तक वाचन असे लहान लहान संकल्प केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वालनाने झाली. मुंबई विद्यापीठ उपकेंद्र मधील प्राध्यापक डॉ. पांडुरंग पाटील, गुरुकुल व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. लोवलेकर, गुरुकुल समन्वयक प्रा. निनाद तेंडुलकर आणि रा .भा. शिर्के प्रशालेतील इतिहास विषय शिक्षक राजेश आयरे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते. गुरुकुल प्रमुख किरण सनगरे यांनी विद्यार्थ्यांना उपासना सांगितली. त्यानंतर गुरुकुलच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अतिशय सुरेल अशी प्रार्थना, ईशस्तव आणि स्वागतगीत सादर केले.

कार्यक्रमात इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेली नीता कोळेकर, द्वितीय क्रमांक अंश वाघमारे, तृतीय क्रमांक विधी डोईफोडे या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभानंतर गुरुकुल शिक्षण पद्धती आणि पंचकोश विकासन या विषयी प्रमुख वक्ते राजेश आयरे यांनी पालक आणि विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. तसेच प्रा. डॉ. पांडुरंग पाटील आणि प्रा. निनाद तेंडुलकर यांनी सुद्धा आपल्या भाषणाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
गुरुकुलमधील अध्यापक वृंद गौरव पिलणकर, सुदेश निवळकर, सागर रसाळ, श्रेयश फटकरे, अक्षय नवरे, यश रहाटे, सौ. मनस्वीनी भोळे, सौ. सरोज पवार, संदीप तेंडुलकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरित्या केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नेत्रा टिकेकर यांनी केले. सौ. गिरीजा करकरे यांनी आभार मानले.



