आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

शेतकऱ्यांनी माती परीक्षणाच्या आधारेच खतांचा वापर करण्याचे आवाहन 

जिल्ह्यात खतांचा सुरळीत पुरवठा व योग्य नियोजन : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले

रत्नागिरी : आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खतांचा सुरळीत पुरवठा व योग्य नियोजन करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. हंगामादरम्यान कोणतीही टंचाई भासू नये यासाठी प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी माती परीक्षणाच्या आधारेच खतांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

जिल्ह्यातील खतांची मागणी लक्षात घेऊन आवश्यक तेवढे खतांचे आवंटन करण्यात आले आहे. यामध्ये युरिया, डीएपी, एनपीके, एसएसपी व संयुक्त खतांचा समावेश असून, मागील वर्षांच्या सरासरी वापराचा विचार करून यंदा साठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.

तसेच, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत पुरेसा साठा राखून ठेवण्यात येणार असून, जिल्ह्यातील २३ ठिकाणी खतांचा ‘बफर स्टॉक’ उपलब्ध राहील. यामध्ये ६५० मे.टन यरिआ आणि ५ मे.टन डीएपी खताचा समावेश आहे.यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळण्यास मदत होणार आहे.

कृषी विभागाने खतांसोबतच बियाण्यांच्या पुरवठ्याचेही नियोजन केले असून, शासकीय व खासगी संस्थांच्या माध्यमातून दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

माती परीक्षण अहवालाच्या आधारे संतुलित खतांचा वापर करावा. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहून उत्पादन खर्चात बचत होईल व उत्पन्नात वाढ होईल, असे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

दरम्यान, कृषी निविष्ठा विक्रेत्यांना देखील सूचित करण्यात आले असून, कोणत्याही परिस्थितीत जास्त दराने किंवा निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची विक्री करू नये. रासायनिक खत विक्रेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत खतांची साठवणूक, काळाबाजार व जादा दराने विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जसे कोणी तसे केल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधितांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल.

तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय हेल्पलाईन क्र. ८८३०२६४३३५ सुरू करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठाबाबत कसल्याही प्रकाराची तक्रार द्यायची असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!