रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्याच्या दुर्मीळ पांढऱ्या पिल्ल्याचे दर्शन
ठिकाणाबाबत वनविभागाची गोपनीयता

रत्नागिरी : जिल्ह्यातील एका घनदाट जंगलात बिबट्याच्या दुर्मीळ पांढऱ्या रंगाच्या पिल्ल्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. काजूची बाग साफ करत असताना शेतकऱ्यांना दोन बिबट्या पिल्ले दिसली, त्यापैकी एकाचे अंग पांढऱ्या रंगाचे होते.
पिल्ले दिसल्याच्या काही क्षणांतच मादी बिबट्या घटनास्थळी आली आणि तिने दोन्ही पिल्लांना घेऊन जंगलात निघून गेली. या दुर्मीळ प्रकारामुळे वनविभाग सतर्क झाला असून, परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जेणेकरून बिबट्या व त्याच्या पिल्लांच्या हालचालींचा मागोवा घेता येईल.
पांढऱ्या रंगाचे बिबट्या पिल्लू ही अतिशय दुर्मीळ बाब मानली जाते. नैसर्गिक उत्पत्तीमध्ये हे अत्यंत अपवादात्मक असल्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी वनखात्याने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
पिल्ले नक्की कुठल्या भागात आढळली याबाबतची माहिती वनविभागाने गोपनीय ठेवली असून, वन्यजीवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.



