मुख्य बातमी

साप्ताहिक धम्मवर्ग, चिपळूणच्या वतीने ‘वर्षावास’ उत्साहात

आबलोली (संदेश कदम) : त्रिरत्न सहाय्यक गण, चिपळूण या धम्म संघटनेच्या वतीने साप्ताहिक धम्मवर्ग, चिपळूणच्या माध्यमातून नुकताच जिद्द गृहनिर्माण संस्था, पाग झरी, चिपळूण या कार्यालयात त्रिरत्न बौद्ध महासंघ, रत्नागिरी या धम्म संघटनेचे आदर्श प्रवचनकार धम्मचारी जिनरुची तथा प्रा. के. एस. सावरे यांच्या अधिपत्याखाली आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने अर्थात गुरुपौर्णिमा, संघ स्थापना दिन व ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला वर्षावास प्रारंभ धम्म संस्कार सोहळा बुद्धवंदना, पूजापाठ, सूत्रपठणाने संपन्न झाला.

त्रिरत्न सहाय्यक गण, चिपळूण ही गेली अनेक वर्ष धम्मचळवळी संबंधित कार्यरत आहे. या धम्म चळवळीच्या माध्यमातून आषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून वर्षावास प्रारंभ दिन साजरा करण्यात आला. बौद्ध धम्मात आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. याच दिवशी भगवान बुद्धांनी आपले पहिले धर्मोपदेश (प्रथम प्रवचन) आपल्या पंचवर्गीय भिक्षूंना सारनाथ येथे दिले. तसेच बुद्धाच्या संघाच्या सुरुवातीचा काळ किंवा स्थापना दिन म्हणून देखील या पौर्णिमेला महत्त्व आहे. या बौद्ध परंपरेतील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने साप्ताहिक धम्मवर्ग,चिपळूणच्या माध्यमातून उपस्थित धम्ममित्र, उपासक, उपासिका यांनी धम्मचारी जिनरूची यांना गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता आषाढी पौर्णिमेचे (गुरुपौर्णिमेचे) आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी धम्मचारी जिनरुची यांनी उपस्थित धम्ममित्र, उपासक,उपासिकांना उपदेश करताना म्हणाले, गुरु पौर्णिमा ही गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे. गुरु हा बौद्ध धर्मीय यांच्या जीवनातील शुद्ध साधनेच्या आरंभाचे मूळ स्वरूप आहे. भगवान बुद्ध हे केवळ बौद्ध धर्मीयांचे गुरु नसून अखंड विश्वातील मानव जातीकरीता सर्वोच्च विश्वगुरू म्हणून गणले जातात. पुढे धम्मचारी जिनरुचीनी आर्यसत्य, अष्टांगिक मार्ग, बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांचे स्पष्टीकरण करून बुद्ध पूजापाठ, शीलाचरण, ग्रंथपठन, चिंतन आणि धम्मदानाचे महत्त्व विशद करून सर्वाकरीता मंगल कामना व्यक्त केल्या.

धम्मचारी जिनरूची तथा प्रा. के. एस. सावरे हे डीबीजे महाविद्यालय चिपळूण येथे विज्ञान शाखेत कार्यरत असून त्यांचा सहाय्यक धम्ममित्र ते धम्मचारी हा प्रवास अत्यंत उद्बोधक असून परिपूर्ण बौद्धधम्माच्या शिलाचरणावर आधारित आहे. या गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करताना गुरुपौर्णिमा वर्षावास प्रारंभ धम्मसंस्कार सोहळ्यासाठी धम्ममित्र प्रकाश पवार गुरुजी, धम्ममित्र सुनील शिवगण गुरुजी, निवृत्त आरोग्य निरीक्षक (चिपळूण) अनंत हळदे, निवृत्त जेष्ठ अभियंता (मुंबई दूरदर्शन केंद्र) धम्ममित्र सुनील गोतपागर, निवृत्त सुभेदार मेजर दत्ताराम मोहिते (यशसिद्धी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष), ॲड. विभावरी रजपूत (चेअरमन, जिद्द गृहनिर्माण संस्था, चिपळूण), आयु. प्रदीप मोहिते (निवृत्त उप महाव्यवस्थापक, महावितरण, कुडाळ), सामाजिक कार्यकर्ते धम्मबंधू सचिन मोहिते, अनिल मोहिते, प्रकाश सावंत, सुरेश जाधव (सचिव, जिद्द गृहनिर्माण संस्था, चिपळूण) आणि मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संघटनेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपले धम्माप्रती व गुरुप्रती मनोगत प्रस्तुत केले. यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!