जिल्हा परिषदेत ७ कर्मचाऱ्यांवर खातेनिहाय चौकशीचा बडगा

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ७ कर्मचाऱ्यांची विभागीय आणि खातेनिहाय चौकशी सुरू आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणारे शिक्षक, प्रशासनाविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणारे शिक्षक तसेच अनियमित कारभार करणारे ग्रामसेवक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही शिक्षकांची ही दुसरी खातेनिहाय चौकशी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सामान्य प्रशासन कोणत्याही विभागात अनियमितता आढळून आल्यास तातडीने चौकशी लावते. शिक्षण विभागातील ४ शिक्षकांची सध्या खातेनिहाय चौकशी सुरू आहे. यापैकी काही शिक्षकांवर विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. तर प्रशासनाविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या शिक्षकाची पुन्हा चौकशी सुरू आहे. एका निलंबित झालेल्या शिक्षकावर प्रशासनाविरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याची पुन्हा चौकशी सुरू झाली असल्याचे सांगण्यात आले.


