पं. जयतीर्थ मेवुंडी यांची उद्या रत्नागिरीत मैफल
शास्त्रीय तसेच अभंगांची सुरेल मेजवानी; स्वराभिषेक, जयेश मंगल पार्कचे आयोजन

रत्नागिरी : येथील स्वराभिषेक संगीत प्रशिक्षण संस्था आणि जयेश मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. लक्ष्मण गाड स्मृती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. यासोबत सौ. श्रुती नाईक (मुंबई) यांच्या शिष्यवर्गाचाकडून भरतनाट्यम् नृत्याचा आस्वादही घेता येणार आहे. उद्या (ता. ९) सायंकाळी ५ वाजता शहरातील थिबा पॅलेस रोडवरील जयेश मंगल पार्क येथे हा संगीत महोत्सव होईल.
स्वराभिषेक संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या सत्रात श्रुती कुणाल नाईक यांच्या चार शिष्या अनुष्का राठोड, पूर्वजा खापणे, परी चौधरी, जिया पिलई भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर भारतासह जगभरातील अनेक संगीत संमेलनात आपल्या भारदस्त आवाजाने रसिकांना खिळवून ठेवणारे गायक म्हणून पंडित जयतीर्थ मेवुंडी यांचे शास्त्रीय तसेच अभंग गायन होईल. हुबळीमध्ये आई सुधा मेवुंडी आणि वडील वसंत मेवुंडी यांच्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध घरात वाढलेल्या मेवुंडी यांनी पंडित अर्जुनसा नाकोड यांच्याकडून एक दशकाहून अधिक काळ पं. मेवुंडी यांनी संगीताचे धडे गिरवले. त्यानंतर त्यांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. श्रीपती पाडेगर यांच्याकडे तालीम घेतली. थिबा महोत्सवातही रत्नागिरीकर रसिकांनी त्यांचा शास्त्रीय कलाविष्कार रसिकांनी अनुभवल आहे.
या मैफलीसाठी गोव्यातील दत्तराज म्हाळशी (गोवा) हे संवादिनीसाथ, अमर मोपकर (गोवा) हे तबासाथ, किशोर तेली (गोवा) हे पखवाजसाथ, तर रत्नागिरीतील अद्वैत मोरे हा युवाकलाकार तालवाद्याची साथ करणार आहेत. दीप्ती आगाशे (रत्नागिरी) या निवेदन करणार असून ध्वनिसंयोजन एस. कुमार साऊंड सर्व्हिसचे उदयराज सावंत करणार आहेत. महोत्सवासाठी जयेश मंगल पार्क मुख्य प्रायोजक असून अनबॉक्स व देसाई बंधू आंबेवाले सहप्रायोजक आहेत. ही मैफल रसिकांसाठी विनामूल्य असून यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
युवा संगीत प्रतिभा शिष्यवृत्ती
स्वराभिषेक संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्ताने यावर्षीपासून भारतीय संगीताची नियमित साधना करणाऱ्या, अभ्यासपूर्ण सादरीकरणाची तयारी असलेल्या स्वराभिषेक संगीत वर्गाच्या होतकरू विद्यार्थ्याला गायक, भजनीमास्तर कै. दिगंबर गाड युवा संगीत प्रतिभा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्याच्या नावाची घोषणा या महोत्सवात केली जाणार आहे.


