मुख्य बातमी

मच्छीमारांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार आणि मत्स्य विभाग कटिबद्ध : मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री नितेश राणे

मिरकरवाडा मासेमारी बंदर विकासकामांचे भूमिपूजन

रत्नागिरी : “किनारपट्टी विकासातील आर्थिक समृद्धी हे महायुती सरकारचे ध्येय असून यासाठीच रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील अनेक वर्ष जुन्या अतिक्रमणाना हटवून आज येथे विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ही कामे वेळेत पूर्ण होतील तसेच येथील मच्छीमारांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार आणि मत्स्य विभाग कटिबद्ध असून भविष्यात येथे विविध विकासकामे करून मिरकरवाडा हे बंदर सक्षम बंदर केले जाईल,” असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.

 

मिरकरवाडा बंदराच्या टप्पा-२ अंतर्गत लिलाव गृह, जाळी विणकाम गृह, प्रशासकीय इमारत, संरक्षक भिंत, अस्तित्वात असलेल्या जेट्टीचे सक्षमिकरण, पाण्याची टाकी, प्रसाधनगृह, काँक्रिट जाण्या-येण्याकरीता रस्ते, उत्तरेकडील ब्रेकवॉटरचे टॉप काँक्रिट रक्कम अशी रु.२२.४३ कोटी इतक्या रकमेच्या कामांचा भूमीपूजन समारंभ आज थाटात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते. बंदरे मंत्री नितेश राणे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.

यावेळी बोलताना उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, ही माझ्यासाठी मनापासून अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे. मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी गेली वीस वर्षं सातत्याने प्रयत्न झाले. पण या कामाला खऱ्या अर्थाने गती आली, ती कोकणातल्या सुपुत्राला मंत्रीपद मिळाल्यानंतर! यासाठी मी सर्व मच्छीमार बांधवांच्या वतीने नितेश राणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. कोकणातील मच्छीमार बांधवांना न्याय आणि चांगले दिवस मिळावेत. हे माझं ठाम मत आहे. आज मिरकरवाड्यातून हजारो कोटींचा मासळी व्यवसाय होतोय. हाच व्यवसाय अधिक सशक्त आणि सुव्यवस्थित करण्यासाठी ‘कृषी व्यवसाय’ म्हणून दर्जा मिळावा ही आमची भूमिका आहे. याचबरोबर, किनारपट्टीवर टाकले जाणारे concrete दगड योग्य दर्जाचे आहेत का? यावर माझं लक्ष आहे. यामध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता असणं आवश्यक आहे.

यावेळी ना. सामंत पुढे म्हणाले की, विधान परिषदेतील नितेश राणे यांचं मच्छीमार बांधवांसाठीचं भाषण ऐकले तर सर्वांचा गैरसमज नक्कीच दूर होईल. मच्छीमार हा माझ्यासाठी फक्त व्यवसाय करणारा नाही, तो माझा परिवार आहे. त्याचं सुख-दुःख, अडचणी, विकास आणि भविष्य यासाठी उदय सामंत सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मिरकरवाडा बंदर हे फक्त बंदर न राहता महाराष्ट्रातलं एक आदर्श मासेमारी केंद्र बनावं, हीच आमची सामूहिक इच्छा असल्याचे सांगितले.

याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मच्छिमार बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!