हातखंबा शाळेजवळील वळणावर गॅस टँकर उलटला
गॅस गळतीमुळे खळबळ : परिसरातील नागरिकांचे स्थलांतर

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा शाळेजवळील अवघड वळणावर २९ जुलै रोजी रात्री ११ वाजता गॅस टँकर पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.


घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, प्रांत अधिकारी जीवन देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव, होम डीवायएसपी श्रीमती फडके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे तसेच शहर पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गॅस गळतीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून आजूबाजूच्या नागरिकांना तातडीने स्थलांतरित करण्यात आले आहे.


दरम्यान, दरम्यान या अपघातामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून पलटी झालेल्या गॅस टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तसेच हातखंबा तिठ्यावरून जाणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक हातखंबा तिठा येथे तत्काळ थांबविण्यात आली होती. पोलिस निरीक्षक विवेक पाटील याठिकाणी नियोजन पाहत आहेत.


वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गांने जाण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले. हातखंबा ते लांजा मार्गासाठी कुवारबाव मार्ग खुला करण्यात आला असून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बावनदी मार्गे वळवण्यात आली आहे. दरम्यान, हातखंबा- पाली मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे.
ही गॅस गळती थांबवण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगणे अनिश्चित आहे.



