मुख्य बातमी

कविकुलगुरू कालिदास संस्कृत अध्ययन केंद्राचा चौथा वर्धापन दिन

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राला स्थापन होऊन आज चार वर्षे पूर्ण होत आहेत. २ ऑगस्ट अर्थात उपकेंद्राचा स्थापना दिवस. राज्याचे उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सहकार्यामुळे हे उपकेंद्र उभे झाले. २ ऑगस्ट २०२१ पासून हे उपकेंद्र रत्नागिरी आणि कोकणवासियांसाठी स्थापन झाले.

उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी उपकेंद्राला वेळोवेळी मार्गदर्शन केले शिवाय त्यांच्याच प्रयत्नामुळे उपकेंद्राला विविध अनुदाने प्राप्त झाली. चार वर्षाच्या काळात या उपकेंद्राला प्रशासन आणि रत्नागिरीकर यांच्याकडून मोलाचे सहकार्य मिळाले. आगामी काळात संस्कृत आणि संस्कृतेतर विषयांसाठी व खासकरून उपकेंद्राचा विस्तार होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न जोमाने करण्याचा उपकेंद्राचा मानस आहे. ज्याप्रमाणे काळ प्रक्रियेनुसार सुरवंटाचे फुलपाखरू होते व कालांतराने ते फुलपाखरू मुक्त विहार करू लागते. अशाप्रकारे उपकेंद्राला देखील आता अधिकाधिक जनमानसात पोहोचवून नावलौकिक करण्यासाठी आम्ही व विश्वविद्यालय नेहमी कार्यरत आहे, असे या विश्वविद्यालयाचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.

स्थापना झाल्यापासून आजतागायत या उपकेंद्राच्या वतीने योगशास्त्र, संस्कृत, वास्तुशास्त्र, ज्योतिष, भारतीय ज्ञान परंपरा, वैदिक गणित, वैदिक परंपरा, नाट्यशास्त्र विषयक अनेक कार्यक्रमांचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले. जगातील सर्वात प्राचीन भाषा असणाऱ्या संस्कृत भाषेला पुन्हा सुगीचे दिवस यावेत आणि जनमानसापर्यंत संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार व्हावा या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी अहर्निशी कार्यरत असणाऱ्या नागपुरातील रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र प्रथमच कोकण भागात स्थापन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला. मागील चार वर्षांच्या काळात या उपकेंद्रात योगशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र तसेच संस्कृत, नाट्यशास्त्र यासारख्या विविध विषयांचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. त्याचप्रमाणे शोधरत्नम् शोध सारसंग्रह आणि शोधरत्नम् शोधनिबंध संग्रह, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत स्मृती प्रबंध, नवन्यायाशी संबंधित जागदीशी, न्यायेन्दुशेखर, गादाधारी यासारखी महत्वाची हस्तलिखिते पुस्तकरूपात आणून त्यांचे प्रकाशन करण्यात आले. लघुजातकम् आणि बृहदवास्तुमाला यांचा शास्त्रीय पद्धतीचा मॅपिंग प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहे. न्याय दर्शन विषयक हस्तलिखित संपादन व प्रकाशन परियोजनेअंतर्गत एक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात आला.

सध्या केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाकडून प्राप्त धर्माशास्त्राविषयक संशोधन प्रकल्प सुरु आहे. आज या उपकेंद्रात सीडीओई म्हणजेच दूरस्थ पद्धतीने १०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाय नियमित अभ्यासक्रमाला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत असून संध्याच्या घडीला ६० विद्यार्थी आहेत. यशस्वी वाटचालीच्या चौथ्या वर्षात या उपकेंद्राने क्षेत्रीय वैदिक संमेलन आयोजित केले होते ज्यात चारही वेदांचे १०० वैदिक मान्यवर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या ४ राज्यातून आलेले होते. रत्नागिरीकरांसाठी भारतीय ज्ञान परंपरा व भारतीय गणित विषयावर कार्यशाळा देखील आयोजित केलेली होती.

उपकेंद्राच्या यशाचा वारसा विद्यार्थ्यांनी अधिक वृद्धिंगत केला. उपकेंद्रातील बीए योगशास्त्राचे विद्यार्थी विनय साने यांनी विद्यापीठ स्तरावर योगशास्त्र विषयात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. बीए योगशास्त्राचा विद्यार्थी विशाल गवस आशियाई योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ अ-२८ ते ३५ वयोगटातून त्याने बॅकबेंडिंग योगासन वैयक्तीक प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

उपकेंद्रात भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे लिखित धर्माशास्त्रावर संशोधन प्रकल्प सुरू आहे. या उपकेंद्राच्या वाटचालीत पदोपदी स्थानिक जाणकार मंडळी, रत्नागिरीकर, स्थानिक महाविद्यालये यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिवाय स्थापनेच्या वेळी तत्कालीन कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, माजी कुलगुरू प्रा. मधुसूदन पेन्ना आणि विद्यमान कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी या तिन्ही विभूतींचे भरीव सहकार्य व अमूल्य मार्गदर्शन उपकेंद्राला मिळाले. आगामी काळात उपकेंद्राच्या उपक्रमांचा आणि अभ्यासक्रमांचा रत्नागिरीकरांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!