सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा लाड यांनी म्हसळ्यातील बालमनांवर केले वाहतूक आणि महिला सुरक्षेचे संस्कार

म्हसळा (संजय खांबेटे) : येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज म्हसळा (जि. रायगड) येथे वाहतूक सुरक्षा व महिलांची सुरक्षा याविषयी वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. मीरा लाड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी धडे देत महिला सुरक्षा आणि वाहतूक सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
वाहतूक शाखा माणगाव पोलीस ठाणे व म्हसळा पोलीस ठाणे यांच्या वतीने हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे आयोजित केला होता. यात मार्गदर्शन करताना वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. मीरा लाड म्हणाल्या, “वाढती रहदारीमुळे विद्यार्थ्यांनीही वाहतुकीचे नियम पाळून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे. अल्पवयीन मुलांनी (१८ वर्षांखालील) दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवणे बेकायदेशीर आणि धोकादायक आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते आणि कायद्याचे उल्लंघन होते. अल्पवयीन मुलाने वाहन चालवल्यास, त्याच्या पालकांना शिक्षा होऊ शकते आणि वाहन जप्त केले जाऊ शकते.” महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना रोखण्यासाठी विद्यार्थिनींनी प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाऊन कणखरपणे तोंड द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला आपणच रोखू शकतो, असे नमूद करतानाच सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. लाड यांनी ११२ या एकाच हेल्पलाईनवरून आता पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमनदल आणि महिला हेल्पलाईनची एकत्रित मदत मिळत असल्याची माहिती दिली. विद्यार्थी दशेपासून ‘गुड टच बॅड टच’ या गोष्टींचेही विद्यार्थिनींना ज्ञान अवगत असावे, असे आवर्जून सांगताना रोजच्या व्यवहारांत घडणारे काही प्रसंग कथन केले. सध्या वाढत असणाऱ्या सायबर क्राईमबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना जागृत केले.
म्हसळा पोलीस ठाण्याचे श्री. चांदोरकर यांनी विद्यार्थ्यांनी गाडी वापराबाबत मार्गदर्शन करताना आपले वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय गाडी चालवू नये, तसेच चालविण्यास होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. लाड यांचा विद्यालयाचे प्राचार्य डी. आर. पाटील यांनी पुष्प देऊन सन्मान केला. ज्येष्ठ शिक्षक श्री. इ. सी.पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एच. बी. मोरे यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

