मुख्य बातमीशैक्षणिक

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात पुस्तक पेढी योजना आणि वाचक गट उद्घाटन कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक आणि मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीचे औचित्य साधून मागासवर्गीय, हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी असलेल्या ‘पुस्तक पेढी’ योजनेअंतर्गत पुस्तक संच वितरण आणि महाविद्यालयीन ग्रंथालयाचा अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय झालेला ‘वाचक गट’ उपक्रमाचे उद्घाटन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, ग्रंथालय समितीच्या समन्वयक आणि संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. मधाळे, ग्रंथपाल किरण धांडोरे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. धांडोरे यांनी डॉ. रंगनाथन यांच्याविषयी आणि त्यांनी केलेल्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. रंगनाथन यांची प्रगल्भ संशोधन दृष्टी आणि त्यांना ग्रंथालयशास्त्राविषयी असलेल्या अत्मियतेविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या वाचकाभिमुख असलेल्या सोयीसुविधांविषयी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. महाविद्यालयीन ग्रंथालयाची पुस्तक पेढी योजना आणि वाचक गट खूप चांगले कार्य करत असून वाढता विद्यार्थी प्रतिसाद ही खूप महत्त्वाची बाब आहे, असे सांगितले.

ग्रंथालय समितीच्या समन्वयक आणि संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या माध्यमातून अजून काही मदत आवश्यक वाटत असेल तर त्यांनी आपल्याला सांगण्याचे आवाहन केले. यानंतर लाभार्थी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वर्षभर वापरण्यासाठी त्यांनी निवड केलेल्या पुस्तकांचे संच वितरीत करण्यात आले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. रंगनाथन यांच्या ग्रंथालय शास्त्रातील महत्वाच्या अशा पाच सूत्रांविषयी माहिती दिली. पुस्तके ही सजीव असून ती उपयोगासाठी आहेत. वाचकाला त्याच्या आवडीचा ग्रंथ मिळाला पाहिजे, वाचकाचा वेळ वाचला पाहिजे आणि ग्रंथालय ही एक वर्धिष्णू संस्था आहे; ही पंचसूत्र वाचन चळवळ पुढे नेण्यास खूप महत्त्वाची असून डॉ. रंगनाथन यांनी त्या अगदी सोप्या शब्दांत त्या जगाला सांगितल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाच्या सर्व उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेऊन विद्यार्थी जीवनात आपली ज्ञानाची उंची वाढविली पाहिजे, तसेच यातून महाविद्यालयाचे नांवही पुढे येईल, असे विध्यार्थ्यांना आवाहन केले.

विद्यार्थी पुस्तक पेढीविषयी सेजल मेस्त्री हिने आपले प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले. यावेळी तिने पुस्तक पेढी मार्फत वर्षभर अभ्यासासाठी पुस्तके मिळणे ही ग्रंथालयाची खूप महत्त्वाची सेवा आहे व माझ्यासारखे विद्यार्थी या सुविधेचा कायम लाभ घेत आहेत, असे मत व्यक्त केले. वाचक गटाविषयी आपले प्रातिनिधिक मत व्यक्त करताना जान्हवी जोशी हिने सांगितले की, अभ्यासाव्यतिरिक्त एक जादा पुस्तक किंवा नियतकालिक घेता येणे ही एक महत्त्वाची सुविधा ग्रंथालयाचा वाचक गट आम्हाला देत आहे, असे सांगून या उपक्रमातील विद्यार्थी सहभाग सतत वाढत आहे, मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कु. ओंकार आठवले याने, तर आभारप्रदर्शन सहा. ग्रंथपाल उत्पल वाकडे यांनी केले. या कार्यक्रमाला पुस्तक पेढीमध्ये सहभागी लाभार्थी विद्यार्थी आणि वाचक गटात सहभागी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!