मुख्य बातमी

संस्कृत भाषेतील ज्ञान टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची : डॉ. प्रसन्न मुळ्ये

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राद्वारे संस्कृत सप्ताह उत्साहात साजरा : रत्नागिरीकरांचा सर्व उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद 

रत्नागिरी : आजच्या आधुनिक युगात परदेशातील तरुण तरुणी भारतात येऊन संस्कृत व शास्त्रांचे अध्ययन करत आहेत. आपले ज्ञान अमूल्य आणि त्रिकालबाधित आहे त्यामुळे अशा देववाणी असणाऱ्या संस्कृत भाषेतील ज्ञान टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असल्याचे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ. प्रसन्न मुळ्ये यांनी केले.

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र व संस्कृतभारती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत महोत्सव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. संस्कृत दिनाचे औचित्य साधत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले होते. या अंतर्गत गीता वेदांत प्रमाणपत्र अभ्यासक्रम, योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम, स्तोत्रपठण वर्ग, भारतीय संस्कृती आणि संस्कृत साहित्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा या विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.

या संस्कृत महोत्सवाच्या कार्यक्रमाप्रसंगी ७ ऑगस्ट रोजी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरीतील आयुवेदाचार्य डॉ. प्रसन्न मुळ्ये हे उपस्थित होते. आपल्या मनोगतात बोलताना डॉ. मुळ्ये म्हणाले की, भारताला संस्कृत भाषेचा उज्ज्वल इतिहास आहे. याच संस्कृतमधून पुढे जाऊन दर्शन, आयुर्वेद, नाट्यशास्त्र, वेद, पुराणे, रामायण, महाभारत यासारख्या दिव्य कृतींचा जन्म झाला. या कार्यक्रमात प्रश्नमंजुषा स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आलेले होते.

कार्यक्रमात दि. १ ते ७ ऑगस्टदरम्यान गीता वेदांत प्रमाणपत्र अभ्यासक्रम, स्तोत्रपठण वर्गात सहभागी रत्नागिरीकरांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना देखील गौरविण्यात आले.

गीतेतील पहिला अध्यायातील श्लोक व अर्थ आणि त्या अनुशंगाने येणाऱ्या वेदांतातील संकल्पना यांचे विवेचन गीता वेदांत प्रमाणपत्र अभ्यासक्रमात करण्यात आले. तर शिवस्तोत्र, विष्णुषोडशनामस्तोत्र, सरस्वतीस्तोत्र, नवग्रह स्तोत्र, पांडुरंगाष्टकम् इ. स्तोत्रांचे पठन व अर्थ विवेचन करण्यात आले.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत रत्नागिरीतील विद्यार्थी, संस्कृतप्रेमी, शिक्षक अशा एकूण २५ जणांनी सदभाग घेतला होता. या मध्ये चार गटांना एकूण पाच फेऱ्यांमध्ये भारतीय संस्कृती परंपरा आणि संस्कृत साहित्य या विषयावरील प्रश्न विचारण्यात आले.

या कार्यक्रमाला संस्कृतभारतीच्या कोकण प्रांत अध्यक्षा डॉ. कल्पना आठल्ये, रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. दिनकर मराठे, दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या मंत्री अक्षया भागवत, नागरिक, रत्नागिरी उपकेंद्रातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

श्रीराम संस्कार केंद्राचे लक्षवेधी सादरीकरण

श्रीराम संस्कार वर्ग नाचणे येथील संस्कार वर्गातील मुलांनी गणितम् ही लघुनाटिका अन्वेष कौठणकर व अदिती गद्रे यांनी सादर केली. तसेच स्वरांजली हेगडे, वीरा हेगडे, सर्वेश मराठे यांनी हस्ती हस्ती हे अभिनयगीत सादर केले. गार्गी शिंदे आणि सिद्धांत मराठे यांनी माता चिंताक्रांता या विषयावर लघुनाटिका सादर केली. संस्कार वर्गाच्या सर्व मुलांनी मिळून जयति जयति भारतमाता हे गीत सादर केले. या सर्व सादरीकरणाचे नियोजन श्रीराम संस्कार केंद्राच्या प्रमुख सौ. रश्मी मराठे यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!