गोहत्या विरोधातील आंदोलनातील केस निकालात

रत्नागिरी : गेल्या वर्षी रत्नागिरीमध्ये झालेल्या गोहत्या विरोधातील आंदोलनप्रकरणी आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने, माजी जिल्हा अध्यक्ष सचिन वहाळकर, सकल हिंदू समाजाचे चंद्रकांत राऊळ यांच्यासह इतर चौवीस आरोपींची काल शासनाकडून केस मागे घेतल्याने, न्यायालयाने निकाली काढत निर्दोष मुक्तता केली.
गेल्या वर्षी एमआयडीसी परिसरात वासराची मान कापलेली आढळल्याने रत्नागिरी मध्ये संतापाची लाट उसळली होती. गोहत्या करणाऱ्या आरोपीं वर कोणतीही कारवाई होत नसल्याने सकल हिंदू समजातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारोंच्या संख्येने हिदू बांधव सहभागी झाले होते. तरीही आरोपीवर कारवाई न झाल्याने आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य रस्त्यावर रस्ता रोको करण्यात आला होता. आरोपीला अटक होत नाही तिथपर्यंत रस्ता रोको मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने अखेर पोलिसांनी आरोपली अटक करत कोर्टात दाखल केले. या वेळी जवळपास चार तास मुख्य मार्ग बंद होता. या प्रकरणात पोलिसांनी अठ्ठावीस जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करून न्यायालयात चार्जशीट दाखल केली होती; परंतु राज्य सरकारच्या सर्क्युलर नुसार ज्या आंदोलनात मारहाण, मालमत्तेचे नुकसान नाही असे गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात असे खटले मागे घेण्याचे राज्य सरकारचे धोरण असल्याने हा खटला राज्य शासनाच्या निर्देशानुसार न्यायालयाने निकाली काढण्यास अनुमती देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याचे कामकाजात आरोपींच्या वतीने ॲड. निनाद शिंदे, ॲड. चाचले. ॲड. थरवळ, ॲड. भाऊ शेट्ये यांनी काम पाहिले.
